पर्यायी विषयांची आवश्यकता नाही
By admin | Published: September 20, 2016 01:27 AM2016-09-20T01:27:52+5:302016-09-20T01:27:52+5:30
राज्यातील दहावीच्या इंग्रजी आणि गणित विषयात नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे.
पुणे : राज्यातील दहावीच्या इंग्रजी आणि गणित विषयात नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. त्यातच एकाही विद्यार्थ्याच्या गुणपत्रिकेवर नापास शेरा येणार नसल्याचे राज्य शासनाने अध्यादेश काढून प्रसिद्ध केले आहे. त्यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांना गणित व इंग्रजी विषयासाठी पर्याय देण्याची खरंच गरज आहे का? तसेच विद्यार्थ्यांना केवळ पास करायचे आहे, की घडवायचे आहेत, असा प्रश्न तज्ज्ञांंकडून उपस्थित केला जात आहे.
राज्य मंडळाच्या निकालाची टक्केवारी गेल्या काही वर्षांपासून वाढत चालली आहे. विद्यार्थ्यांना ८०/२० पॅटर्नमुळे गुणांची खिरापत वाटली जात आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, या उद्देशाने जुलै महिन्यातच पुरवणी परीक्षा घेतली जात आहे. विद्यार्थ्यांच्या निकालाची टक्केवारी वाढविण्यासाठी हे निर्णय घेतले जात असल्याचे बोलले जात आहे. मात्र, त्यामुळे गुणवत्तावाढीकडे दुर्लक्ष होत असल्याचे मत शिक्षणतज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.
दहावीमध्ये गणित विषयात नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या २०१३ नंतर दुपटीने कमी झाली आहे. मार्च २०१६ च्या परीक्षेत १५ लाख ९९ हजार २३२ विद्यार्थ्यांपैकी १ लाख ८७ हजार १७० विद्यार्थी गणित विषयात नापास झाले. तर इंग्रजी विषयाची परीक्षा दिलेल्या १४ लाख ३८ हजार ९०६ विद्यार्थ्यांपैकी १ लाख १९ हजार २२३ विद्यार्थी नापास झाले.
त्यातील काही विद्यार्थ्यांनी जुलै महिन्यात घेण्यात आलेल्या पुरवणी परीक्षेत नापास झालेल्या विषयांची परीक्षा दिली. त्यामुळे या दोन विषयात नापास झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे, असे म्हणता येणार नाही. विद्यार्थ्यांना दहावीपासूनच पर्यायी विषय निवडण्याची संधी दिली तर नापास होण्याच्या भीतीने अनेक विद्यार्थी गणित व इंग्रजी विषय घेणार नाहीत. दहावीमध्ये विद्यार्थी सर्व विषयांत परिपक्व होतातच असे नाही. पुढील काळात विद्यार्थ्यांची विज्ञान, वाणिज्य आदी शाखेतील प्रवेशाची दारे बंद होतील. त्यामुळे पर्यायी विषय देण्याचा निर्णय घेऊ नये, असे मत तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे. (प्रतिनिधी)
>गेल्या पाच वर्षात इंग्रजी विषयात ६९ लाख ९५ हजार १११ विद्यार्थ्यांपैकी ६ लाख ८१ हजार ८८८ विद्यार्थी नापास झाले, तर गणित विषयाच्या ७७ लाख ४३ हजार ४१२ पैकी २ हजार १६0 विद्यार्थी नापास झाले.
>आपल्याला विद्यार्थी घडवायचे आहेत की केवळ पास करायचे आहेत. यापूर्वीही पर्यायी विषय देण्याचे निर्णय घेतल्यामुळे जुन्या पिढ्यांचे नुकसान झाले होते. विद्यार्थ्यांना सामान्य गणित हा विषय देण्यात आला आहे. या विषयांना पर्याय दिल्याने शिक्षणाच्या हेतूला छेद दिला जाणार आहे. विद्यार्थ्यांना परिपक्व करण्यासाठी गणित व इंग्रजी विषयांना पर्याय देता येणार नाही. या निर्णयामुळे पुन्हा एकदा अनेक पिढ्या बरबाद होतील.
- उज्ज्वलादेवी पाटील, माजी अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ