'बाळासाहेबांना दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी शहा-फडणवीसांच्या आशीर्वादाची गरज नाही!'
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2019 08:52 PM2019-11-08T20:52:00+5:302019-11-08T21:29:55+5:30
भाजपा आणि शिवसेनेमध्ये मुख्यमंत्रिपदावरून निर्माण झालेला वाद आता विकोपाला गेला आहे.
मुंबई - भाजपा आणि शिवसेनेमध्ये मुख्यमंत्रिपदावरून निर्माण झालेला वाद आता विकोपाला गेला आहे. दरम्यान, शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद देण्याचे आश्वासन दिलेच नव्हते, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा तीळपापड झाला आहे. तसेच बाळासाहेबांना दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी शहा-फडणवीसांच्या आशीर्वादाची गरज नाही, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला.
मुख्यमंत्रिपदाबाबत अमित शाह यांच्याशी चर्चा झाली होती आणि त्यात त्यांनी अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद देण्याबाबच आश्वासन दिले होते, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांनी केलेला दावा खोडून काढला. भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी युतीबाबत चर्चा करताना आम्हाला उपमुख्यमंत्रिपद देऊ असे सांगितले होते. युतीबाबतची चर्चा एकदा फिस्कटल्यानंतर अमित शाहांचा मला फोन आला होता. त्यावेळी त्यांनी उद्धवजी तुम्हाला काय पाहिजे अशी विचारणा केली. तेव्हा मी सांगितले की मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री सत्तेवर आणेन असे वचन दिले आहे, असे सांगितले.''
दरम्यान, ''आता मला खोटा ठरवण्याचा प्रयत्न होत आहे. खोटं बोलणं आमच्या संस्कारात नाही. खरा कोण, खोटा कोण हे महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे खोटारडेपणा जोपर्यंत मान्य करत नाहीत तोपर्यंत भाजपाशी चर्चा करणार नाही. तसेच मला खोटा ठरवत असतील तर भाजपाशी कोणतंही नातंही ठेवणार नाही,'' असेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.