छायाकल्प चंद्रग्रहणाचे वेध पाळण्याची नाही गरज
By admin | Published: February 8, 2017 05:35 PM2017-02-08T17:35:53+5:302017-02-08T17:35:53+5:30
छायाकल्प चंद्रग्रहणाचे वेध पाळण्याची आवश्यकता नाही, अशी माहिती पंचागकर्ते मोहन दाते यांनी दिली
आप्पासाहेब पाटील/ आॅनलाइन लोकमत
सोलापूर, दि. 8 - छायाकल्प चंद्रग्रहणाचे वेध पाळण्याची आवश्यकता नाही, अशी माहिती पंचागकर्ते मोहन दाते यांनी लोकमतच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे. दरम्यान, १०, ११ फेब्रुवारी रोजी छायाकल्प चंद्रग्रहण आहे, पृथ्वीच्या गडद व विरळ छाया अशा २ प्रकारच्या सावल्या असतात. त्यापैकी विरळ सावलीतून जेव्हा चंद्र जात असतो तेव्हा जे ग्रहण होते त्यास छायाकल्प चंद्रग्रहण असे म्हणतात.
या प्रकारच्या ग्रहणामध्ये चंद्रबिंब झाकले जात नाही, तर विरळ सावलीमुळे ते धूसर झालेले दिसते. भारतासह जपान सोडून संपूर्ण आशिया खंड, युरोप, आफ्रिका, उत्तर आणि दक्षिण अमेरिका या प्रदेशांमध्ये हे ग्रहण दिसणार आहे. १० फेब्रुवारीला शुक्रवारच्या उत्तर रात्री व ११ फेब्रुवारी शनिवारच्या पहाटे, असे हे ग्रहण दिसणार आहे. ११ फेब्रुवारी रोजी भारतीय प्रमाण वेळेनुसार पहाटे ४ वाजून ४ मिनिटांनी ग्रहणाचा स्पर्श होईल आणि सकाळी ८ वाजून २३ मिनिटांनी ग्रहण मोक्ष होईल.
हे ग्रहण छायाकल्प पद्धतीचे असल्याने धर्मशास्त्रानुसार या चंद्रग्रहणाचे वेधादि कोणतेही नियम गर्भवती महिलांसह कोणीही पाळण्याची आवश्यकता नाही. १० फेब्रुवारी व ११ फेब्रुवारी रोजी माघस्नान, गुरुप्रतिपदा आहे. परंपरेप्रमाणे हे उत्सव साजरे करता येतील असेही मोहन दाते यांनी सांगितले़