शास्त्रीय गायनाला टेकूची गरज नाही!
By admin | Published: February 1, 2016 02:06 AM2016-02-01T02:06:47+5:302016-02-01T02:06:47+5:30
प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित अजित कडकडे यांचे प्रतिपादन.
प्रफुल बानगावकर/ कारंजा (वाशिम): शास्त्रीय संगीत आणि गायन याला स्वतंत्र अस्तित्व आहे. ते स्वत:च मजबूत असल्यामुळे त्याची व्याप्ती वाढविण्यासाठी किंवा ते टिकविण्यासाठी शासनाने प्रयत्न करावे, असे मुळीच आवश्यक नाही. शास्त्रीय संगीताला कोणत्याही टेकूची मुळीच गरज नाही, असे प्रतिपादन प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित अजित कडकडे यांनी व्यक्त केले. कारंजा येथे सुरू असलेल्या नृसिंह सरस्वती स्वामी महाराजाच्या जन्मोत्सवानिमित्त रविवारी ते गायनासाठी आले असता लोकमतशी त्यांनी शास्त्रीय गायनाच्या स्थितीबाबत संवाद साधला.
शास्त्रीय गायनाचा वारसा नसतानाही तुम्ही या क्षेत्राकडे कसे वळले?
माझे गुरू पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या गायनामुळे प्रभावित होऊन मी शास्त्रीय गायनाकडे वळलो.
उत्तर हिंदुस्थानी आणि कर्नाटकी शास्त्रीय गायनातील फ रक काय?
उत्तर हिंदुस्थानी शास्त्रीय गायनात सूर लांबविले जातात. कर्नाटकी शास्त्रीय गायनात तसं नाही. त्या प्रकारात सूर फारसे लांब नसतात. त्या प्रकारात सूर अगदी लहान असतात. म्हणजे अगदी लगेच सोडले जातात.
शास्त्रीय गायन स्वरप्रधान आहे, असे का म्हटले जाते?
शास्त्रीय गायनात आलाप आणि ताण यालाच महत्त्व असते. या गायनात शब्दांना मुळीच महत्त्व नसते. स्वरांवर भर दिला जातो. त्यामुळेच शास्त्रीय गायन स्वरप्रधान असल्याचे म्हटले जाते.
शास्त्रीय गायनाचा एक विशिष्ट श्रोता वर्ग आहे आणि तोसुद्धा कमी होत चालल्याचे वाटत नाही काय?
नाही, तसे काहीही नाही. आपल्याला तसे वाटते. मुंबईत शास्त्रीय गायनाच्या मैफली हाऊसफुल्ल असतात. शास्त्रीय गायन एक समुद्र आहे. आजकालच्या धामधूम गाण्यामुळे लोकांना तसे वाटत असले तरी, त्या केवळ लाटा आहेत. त्या येतात आणि जातात. समुद्र मात्र पूर्वीसारखाच कायम अथांग असतो, तसे शास्त्रीय गायनाचे आहे.
शास्त्रीय गायनाकडे नव्या पिढीने कोणत्या दृष्टीने पाहायला हवे?
त्यांनी या क्षेत्राकडे कलेच्या दृष्टिकोनातून बघावे; परंतु तेवढय़ाने चालणार नाही. पूर्वी कलाकारांना राजाश्रय होता. कला सादर केली, की त्यांना मोहरा बक्षिसादाखल मिळायच्या, आता तसे नाही. मग निव्वळ कला म्हणून काम करताना पोट कसं भरेल? तुमची कला लोकांना आवडली, की तुम्ही त्यातून अर्थार्जन करायला काही हरकत नाही.
मागील ४0 वर्षांंपासून तुम्ही शास्त्रीय गायन करीत आहात. या वर्षांंमध्ये तुम्हाला संगीत क्षेत्रात कोणते महत्त्वपूर्ण बदल आढळून आले?
कलेबरोबरच उदरभरणाचादेखील दृष्टिकोन आहे. मी वेगवेगळय़ा कार्यक्रमांचे ५0 हजार, ६0 हजार घेत असेल म्हणजे उदरभरण आलेच. तरुणांना कलेची आवड असण्यासोबतच पैसेही मिळायला हवे. नवी पिढी त्याकडे जास्त डोळसपणे पाहते.
आयुष्यात मंचावर गायलेले पहिले गीत कोणते?
मी स्टेजवर ठरवून कधीच गायन केलं नाही. स्टेजवर गेल्यांतर गुरू महाराज जसं सुचवतील तसं गायचे. त्यामुळं ते मला सांगता येणार नाही.
नरसोबाची वाडी कारंजा, गुरू महाराज हे आमचे माहेर आहे. त्यामुळे कारंजा हे आमचे माहेर आहे, असेआम्ही म्हणतो. सासरी नांदायला गेलेल्या मुलीचं जसं माहेरी लक्ष असतं, अगदी तसंच आमचं लक्ष गुरू महाराजांकडे असतं.
मागील दोन वर्षांंंपासून शासनाने शिक्षणातील कला विषयाबाबत निर्णय घेणे बंद केले, याबाबत तुमचे मत काय?
मला शासनाबाबत काहीही म्हणायचे नाही. काय करायचे काय नाही ते त्यांनी ठरवायचे आहे. मी त्याबाबत काही मत व्यक्त केल्याने काही फरक पडेल काय?
तुमचा वारसा चालवेल, असा कुणी शिष्य आहे कl?
हो आहेत; पण नुसतं शिकून चालता येणार नाही, गुरू केवळ मार्ग दाखू शकतो, त्या मार्गावर चालायचे कसे, हे शिष्यांनी ठरवायचं असतं. तेथे गुरू तुमच्याबरोबर येऊ शकणार नाही.
युवकांना अभंग, भक्तिगीत, संगीताबद्दल काय संदेश द्याल?
काहीच नाही. भक्ती संगीत म्हणजे संतांनी जे लिहिलं त्यात मोठी शक्ती आहे, अजित कडकडेने भक्तिसंगीत मोठे नाही केले. भक्ती संगीतातील संतांच्या शक्तीने अजित कडकडेला मोठं केलं.
प्रश्न: जुन्या काळातील पारपंरिक भजन कला आता लोप पावत चालली आहे. त्याचे कारण काय?
आता लोकांना पारंपरिक भजनं आवडत नाहीत. शहरी भागातील लोकांना पारंपरिक भजन आवडत नाही; परंतु खेड्यातील लोकांना मात्र ते अजूनही आवडतं. फॅशन बदलल्याप्रमाणे आता पारंपरिक भजनांची जागा चक्रीभजनांनी घेतली आहे आणि लोकांना आवडतं, तेच तुम्हाला करावं लागतं.