ज्ञानोबा, तुकोबा आणि विठ्ठलाच्या दर्शनाला कशाला कुणाची परवानगी हवी : शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2020 03:29 PM2020-02-08T15:29:34+5:302020-02-08T17:35:41+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे नेहमीच हिंदू धर्मा, रामायणाला विरोध करतात. ते नास्तिक मंडळींना पाठिंबा देतात..
आळंदी : विठ्ठलाच्या, माऊलींच्या आणि तुकोबांच्या दर्शनाला जायचं असेल तर कोणाची परवानगी घ्यावी लागत नाही. त्यामुळे कोणी सांगितलं की, तुम्हाला परवानगी नाही. तर त्यांना वारकरी संप्रदायाचा अद्याप विचारच समजलेला नाही. विशेषत: सच्चा वारकरी अशी भूमिका कधीही घेणार नाही. आणि त्याकडे मी फारसे लक्ष देत नाही असा खोचक टोला माजी केंद्रीय कृषिमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाव न घेता राष्ट्रीय वारकरी परिषदेला लगावला.
स्वानंद सुखनिवासी सदगुरू विष्णुबुवा जोग महाराज पुण्यतिथी शताब्दी सोहळ्यास सदिच्छा भेट देण्यासाठी शनिवारी (दि.८) पवार आळंदीत आले होते. याप्रसंगी उपस्थित भाविकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी कामगार मंत्री दिलीप वळसे - पाटील, आमदार दिलीप मोहिते - पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, ह.भ.प. मारुती महाराज कुर्हेकर, अध्यक्ष संदीपान महाराज शिंदे, माजी आमदार विलास लांडे, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, रामयनाचार्य रामरावजी महाराज ढोक, नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, बबनराव कुऱ्हाडे, डी. डी. भोसले, मुख्याधिकारी समीर भूमकर, सुरेश वडगावकर, कैलास सांडभोर आदिंसह अन्य मान्यवर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पवार पुढे म्हणाले, समाजाने खूप काही दिलं आहे. आजपर्यंत चौदा वेळा निवडून दिले असून चार वेळा मुख्यमंत्री केले. त्यामुळे ५२ वर्ष अखंड समाजाची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. ज्या समाजाने आजपर्यंत भरभरून प्रतिसाद दिला; त्या समाजासाठीच स्वत:ला वाहून घेणे हे माझे आद्य कर्तव्य आहे. त्यामुळे आपण ज्या विकासकामांची मागणी करत आहात अशी कामे प्राधान्याने मार्गी लावली जातील. विशेषत: आळंदीतील प्रश्न स्थानिक आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष व नगराध्यक्षांची विशेष बैठक घेऊन मार्गी लावू. आणि हे आश्वासन नाही तर आपले कर्तव्य असल्याचे पवार यांनी सांगितले.
दरम्यान माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी माऊलींच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले. देवस्थानच्या वतीने विश्वस्तांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
पंढरपूर येथे राष्ट्रीय वारकरी परिषदेने प्रसिद्धी पत्रकात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे नेहमीच हिंदू धर्माला विरोध करतात. ते रामायणाला विरोध करतात. पवार नास्तिक मंडळींना पाठिंबा देतात. त्यामुळेच त्यांना यापुढे वारकऱ्यांच्या कुठल्याही कार्यक्रमाला बोलवण्यात येऊ नये; अशा आशयाचं पत्रक राष्ट्रीय वारकरी परिषदेने जारी केले होते. शनिवारी (दि.८) आळंदीत शरद पवारांनी यावर भाष्य केले.
" आपणाला जो रस्ता पसंत आहे; त्या रस्त्यावर प्रामाणिक पणाने जायचं असत. तिथे बांधिलकी ठेवायची असते. त्यांच्यामध्ये तडजोड करायची नसते. याच भावनेने आळंदीत येऊन माऊलींचे दर्शन घेतले. तसेच जोग महाराज जन्मशताब्दी सोहळ्यात सहभागी झालो. मी स्वत:ला धन्य मानतो.
- शरद पवार, माजी केंद्रीय कृषिमंत्री.