संजय राऊतांसारखा प्रवक्ता कुणाला मिळू नये, शिवसेनेचे मित्र संपवले; शिंदे गटाचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2022 08:44 PM2022-06-26T20:44:13+5:302022-06-26T20:44:52+5:30
Eknath Shinde's Revolt: राऊतांनी चारवेळा शिवसेना फोडणाऱ्या राष्ट्रवादीसोबत शिवसेनेला फरफटत जाण्यात भाग पाडले, असा आरोप दीपक केसरकर यांनी केला आहे.
बंडखोर आमदारांविरोधात बोलताना संजय राऊत यांची जीभ घसरली आहे. यावर एकनाथ शिंदे गटाकडून बोलताना दीपक केसरकर यांनी संजय राऊत यांच्यासारखा प्रवक्ता कुठल्याही पक्षाला मिळू नये, राऊतांनी शिवसेनेचे मित्र संपविले, असा घणाघाती आरोप केला आहे.
बाळासाहेब ठाकरेंनी कोकण, सिंधुदुर्ग जिंकायचा आहे, असे म्हटलेले. मी जिंकलो. राणेंची दहशत नाहीशी केली. संजय राऊतांनी काय केले, असा सवाल दीपक केसरकर यांनी केला. तसेच राऊत म्हणतात की एका बापाचे असाल तर, हा महाराष्ट्राच्या महिलांचा अपमान आहे. याचा अर्थ काय होतो, हे शिवसेनेला चालते का? असा सवालही त्यांनी केला.
राऊतांनी चारवेळा शिवसेना फोडणाऱ्या राष्ट्रवादीसोबत शिवसेनेला फरफटत जाण्यात भाग पाडले. मी राष्ट्रवादीतून आलो असे ते म्हणातात तर त्यांनी मेमरी नीट करावी, मी राष्ट्रवादीत आमदार होतो. तिथून इकडे आलो. राऊत म्हणतात हा पान टपरीवर जाईल तो भाजी विकेल, हा रिक्षा चालवेल. हे ऐकून शिवसेना आमदारांच्या डोळ्यात पाणी आले. कुठे ते प्रेमाने पाठीवर हात फिरविणारे बाळासाहेब कुठे हे, अशा शब्दांत केसरकर यांनी नाराजी व्यक्त केली.
याच पान टपरीवाल्याने, भाजी विक्रेत्याने शिवसेना मोठी केली. एक आमदार तर लग्नाच्या आदल्या रात्री पर्यंत तुरुंगात होता. त्याच्या सासऱ्याने तो सुटला नाही तर त्याच्या फोटोसोबत मुलीचे लग्न लावून देण्याचे ठरविले होते. अशा लोकांनी शिवसेना उभी केली आहे. राऊत कुठेतरी लेख लिहत होते, ते माझ्यासारखेच बाहेरून आले आहेत आणि ज्यांनी शिवसेना वाढविली त्यांच्याविरोधात घाणेरडे, अपशब्द वापरत आहेत, असे केसरकर म्हणाले. शिवसेनेच्या निवडणूक चिन्हावर निवडून आलेले ३९ आणि इतर १२ असे ५१ आमदार आमच्यासोबत आहेत, असा दावाही केसरकर यांनी केला.
याचबरोबर केसरकर यांनी मनसेत शिंदे गट विलीन करत असल्याच्या चर्चा फेटाळून लावली. आम्हीच शिवसेना आहोत, यामुळे कुठल्या पक्षात विलिनीकरण करण्याची आम्हाला गरज नाही, असे केसरकर म्हणाले. आम्ही पुढील तीन चार दिवसांत महाराष्ट्रात येऊ, आम्ही फ्लोअर टेस्ट घेण्यासाठी तयार आहोत, असेही केसरकर म्हणाले.