हसन मुश्रीफांना कुणीच वाचवू शकणार नाही, भाजप नेते किरीट सोमय्यांचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2021 02:45 PM2021-09-27T14:45:09+5:302021-09-27T14:45:56+5:30
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आनंदराव अडसूळ आणि हसन मुश्रीफ यांच्यावर टीका केली आहे.
मुंबई: सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेतील 980 कोटीच्या घोटाळ्याच्या आरोपाप्रकरणी शिवसेनेचे अमरावतीचे माजी खासदार व बँकेचे माजी अध्यक्ष आनंदराव अडसूळ व त्यांच्या पुत्र अभिजित यांना ईडीने समन्स बजावले आहे. यानंतर लगेच त्यांची तब्येत बिघडल्याची बातमी समोर आली. यावरुन आता भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी निशाणा साधला आहे.
ईडीचं पथक घरी पोहोचताच शिवसेना नेते आनंद अडसूळांची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल
मीडियाशी बोलताना सोमय्या म्हणतात की, सीटी को-ऑपरेटिव्ह बँकेचे कोट्यवधी रुपये अडकले आहेत. अडसूळ आणि उद्धव ठाकरे याबाबत उत्तर देत नाहीत. अडसूळ पिता-पूत्र यांनी कोट्यवधी रुपये खासगी खात्यात वळवले. कर्नाळा बँक प्रकरणातही कोणतीच कारवाई झाली नाही. शेवटी ईडीला कारवाई करावी लागली, असं ते म्हणाले.
मुश्रीफांना कुणीच वाचवू शकणार नाही
यावेळी सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावरही निशाणा साधला. हसन मुश्रीफ मला या ना त्या प्रकारे थांबवण्याचा पयत्न करत आहेत. उद्या मुश्रीफ यांच्या तिसऱ्या आणि चौथ्या घोटाळ्याचीही तक्रार करणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून यांनी केवळ लुटा हेच शिकलंय. पोलिसांचा गुंडांसारखा वापर केला. आता ते थांबवू शकणार नाहीत. मी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना आव्हान देतो की हिम्मत असेल तर मला थांबवा. हसन मुश्रीफ यांना तुरुंगात जाण्यापासून कुणीही वाचवू शकणार नाहीत, असंही ते म्हणाले.