ज्येष्ठांवर कारवाईचा प्रश्नच नाही - गडकरी
By admin | Published: November 14, 2015 03:55 AM2015-11-14T03:55:03+5:302015-11-14T03:55:03+5:30
भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींसह चार ज्येष्ठांनी बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालावर व्यक्त केलेल्या मतांवर पक्षात मंथन सुरू झाले आहे.
नागपूर /नवी दिल्ली : भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींसह चार ज्येष्ठांनी बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालावर व्यक्त केलेल्या मतांवर पक्षात मंथन सुरू झाले आहे.
त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे स्पष्टीकरण मागण्याचा किंवा त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. त्याचवेळी, पराभवाची जबाबदारी निश्चित करा, या अडवाणींच्या मागणीचे भाजपाचे दिल्लीतील खासदार मनोज तिवारी आणि बिहारमधील खा. आर.के. सिंग यांनी समर्थन केल्यामुळे असंतुष्ट नेत्यांची भर पडू लागली आहे.
गडकरी यांनी जारी केलेल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे की, अडवाणी व जोशी हे दोन्ही आमचे आदरणीय व ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्याबद्दल आपण वा अन्य कोणत्याही नेत्याने अनादर व्यक्त केला नाही. मात्र, मी या नेत्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केल्याच्या बातम्या प्रसार माध्यमांमध्ये आलेल्या आहेत. त्या बातम्या दिशाभूल करणाऱ्या व निराधार आहेत.
बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पराभवाची संयुक्त जबाबदारी स्वीकारणे म्हणजे स्वत:चा बचाव करण्यासारखे आहे, विजयाचे श्रेय घेणारे आता पळ का काढताहेत, अशी परखड भूमिका ज्येष्ठ नेत्यांनी यातून मांडली होती. ज्येष्ठ नेत्यांनी एकत्र येत अशाप्रकारे नेम साधल्यामुळे भाजपमध्ये सुंदोपसुंदी वाढली. पराभवानंतर खचलेल्या पक्षाला आधार देण्याऐवजी ज्येष्ठ नेत्यांनी अशी आगपाखड केल्यामुळे या ज्येष्ठ नेत्यांवर कारवाई होईल की काय, अशी शंका होती. मात्र, ज्येष्ठ नेत्यांच्या वक्तव्यांचा आदर करीत त्यावर मंथन करण्याची भूमिका भाजपने घेतल्याचे गडकरी यांच्या निवेदनावरून स्पष्ट होत आहे.
—————
जाहीरपणे विधाने करण्याऐवजी पक्षाच्या व्यासपीठावर मुद्दा मांडायला हवा होता, असे सांगत केंद्रीय मंत्री एम. वेंकय्या नायडू यांनी पक्षातील ज्येष्ठांना सबुरीचे बोल सुनावले आहेत. पण देशाला आणि पक्षाला नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व हवे आहे, त्याचवेळी ज्येष्ठांचे मत आणि त्यांनी व्यक्त केलेली चिंताही विचारात घेतली जाईल, असे नायडू यांनी स्पष्ट केले. आम्ही सर्व संबंधितांशी या मुद्यांवर चर्चा करणार आहोत. संसदीय मंडळाने यापूर्वीच बिहार निवडणुकीतील पराभवाला कारणीभूत ठरलेल्या त्रुटींवर चर्चा करण्याचा निर्णय घेतला आहे.(लोकमत न्यूज नेटवर्क)
————————————
मी पक्षाध्यक्ष आणि अटलजी आमचे नेते असताना भाजपने २००४ मधील लोकसभा निवडणूक गमावली होती. २००९ मध्ये संपुआ-२ सत्तेवर आली तेव्हा अडवाणी हे आमचे नेते होते. आम्ही त्यावेळी काही राज्यांतील विधानसभा निवडणुकीत पराभूत झालो होतो, असेही नायडूंनी नमूद केले.
————————————————
असहिष्णुतेवर संसदेत
चर्चा करण्याची तयारी
विरोधक सहिष्णुता दाखवत संसदेचे कामकाज चालवू देत असतील तर सरकारची असहिष्णुतेसह कोणत्याही मुद्यावर बोलण्याची तयारी आहे. बिहार निवडणुकीचा निकाल हा संसदेच्या कामकाजाचा खोळंबा करण्यासाठीच आहे, असा अर्थ काढला जाऊ नये. सरकारला कोणत्याही मुद्यावर चर्चा करण्यात अडचण नाही, असे नायडू यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले.
——————
पक्षनेतृत्वाविरुद्ध बंडाचा झेंडा उगारणाऱ्या ज्येष्ठांनी शुक्रवारी आपसांत चर्चा करीत बिहारमधील पराभवावर ‘विचारमंथन’ केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांना जबाबदार धरत कठोर शब्दांत निवेदन जारी करणारे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी लालकृष्ण अडवाणी यांची भेट घेतली. सिन्हा आणि मुरली मनोहर जोशी यांनी स्वतंत्ररीत्या चर्चाही केली. चौथे ज्येष्ठ नेते शांताकुमार यांनी शुक्रवारी सूर काहिसा मवाळ करीत पक्षनेतृत्वाने ज्येष्ठांशी चर्चा सुरू केल्याचे स्वागत केले. चर्चा सुरूच राहावी असेही ते म्हणाले. मी जोशी आणि अडवाणी यांना भेटलो याखेरीज माझ्याकडे सांगण्यासारखे काहीही नाही, असे सिन्हा यांनी म्हटले. अरुण जेटली यांनी अडवाणी आणि जोशी यांची भेट घेतली आहे. पक्षाकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. चर्चा सुरू झाली आहे, ती सुरू राहावी, मी समाधानी आहे, असे शांताकुमार यांनी नमूद केले.
————-