आधारकार्ड लिंक नसल्यास रेशन नाही
By admin | Published: January 16, 2017 03:34 AM2017-01-16T03:34:07+5:302017-01-16T03:34:07+5:30
राष्ट्रीय अन्नसुरक्षायोजनेअंतर्गत पात्र शिधापत्रिकाधारकांना रेशन घेतांना आधार क्रमांक लिंक करणे बंधनकारक
शौकत शेख,
डहाणू- राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत पात्र शिधापत्रिकाधारकांना रेशन घेतांना आधार क्रमांक लिंक करणे बंधनकारक असून ते नसल्यास फेब्रुवारीपासून अशा लाभार्थ्यांचे रॉकेल व धान्य पुरवठा बंद होणार आहे. तसेच त्यांच्या शिधापत्रिकाही रद्द करण्यात येणार आहे.
आधार क्रमांक अनिवार्य केल्याने राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत समाविष्ट असलेल्या ज्या शिधापत्रिकाधाकांकडे आधार क्रमांक नसेल त्यांनी तो ३१ जानेवारीपर्यंत द्यावा लागणार आहे.
साडेचार लाख लोकसंख्या असलेल्या डहाणू तालुक्यात सत्तर टक्के पेक्षा अधिक लोकवस्ती आदिवासी असून तालुक्यात ७५ हजार शिधापत्रिकाधारक आहेत. यात पिवळ्या, केशरी, शुभ्र कार्ड धारकांचा समावेश आहे. तहसिलदार प्रितीलता कोरेथी यांनी रेशन दुकानदार तसेच किरकोळ रॉकेल परवानेधारकांची बैठक घेऊन ती मध्ये जोडलेली शिधापत्रिकाधारकांकडून आधारक्रमांक तसेच बँक खात्याचा क्रमांक गोळा करण्याचे आदेश परवानेधारक दुकानदारांना दिले.
आधार क्रमांक, बँकखात्याचा क्रमांक आपल्या रेशन दुकानदारांकडे देण्याचे आवाहन पुरवठा निरीक्षक गांगुर्डे यांनी केले आहे. दरम्यान लाभार्थ्यांकडून आधार क्रमांक तसेच बँकखात्याची माहिती घेण्याची जबाबदारी रेशन दुकानदार तसेच रॉकेल विक्रेत्यांवर सोपविल्याने शेकडो दुकानदारांनी, रॉकेल विक्रेत्यांनी आपले परवाने परत केले आहेत.