भाजपाकडून सेनेच्या टॅबला ‘नो रिचार्ज’!

By admin | Published: September 26, 2015 03:19 AM2015-09-26T03:19:32+5:302015-09-26T03:19:32+5:30

राज्यातील सत्तेत प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेनेच्या महत्वाकांक्षी शालेय टॅब योजनेला भाजपाकडील शिक्षण व वित्त खात्याकडून अद्याप ‘रिचार्ज’ न मिळाल्याने ही योजनाच रखडली आहे

No recharges from BJP on Senna's tab! | भाजपाकडून सेनेच्या टॅबला ‘नो रिचार्ज’!

भाजपाकडून सेनेच्या टॅबला ‘नो रिचार्ज’!

Next

संदीप प्रधान, मुंबई
राज्यातील सत्तेत प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेनेच्या महत्वाकांक्षी शालेय टॅब योजनेला भाजपाकडील शिक्षण व वित्त खात्याकडून अद्याप ‘रिचार्ज’ न मिळाल्याने ही योजनाच रखडली आहे.शिवसेनेचा सहभाग असतानाही शिक्षण व अर्थ या भाजपाकडील खात्यांचा शिवसेनेच्या टॅब योजनेला राजश्रय न लाभल्याने ही योजना रोडावली असून आतापर्यंत खासगी शाळांतील ६५०० तर महापालिका शाळेतील २२०० विद्यार्थ्यांच्या हातात टॅब पडला आहे.
इयत्ता ८ वी ते १०वीच्या विद्यार्थ्यांना टॅब देऊन त्यांच्या दप्तराचे वजन कमी करण्याची तसेच ई-लर्निंगच्या दिशेने पाऊल टाकण्याची ही योजना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीपूर्वी जाहीर केली होती. राज्यातील ८ वी ते १०वीच्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या सुमारे ३० लाखांच्या घरात असून त्या तुलनेत सध्या टॅब हाती पडलेल्या विद्यार्थ्यांची संख्या अत्यल्प आहे. शिवसेनेच्या एका टॅबची किंमत साडेतीन हजार रुपये असून ८वी ते १०वीच्या सर्वच विद्यार्थ्यांना टॅब द्यायचा झाल्यास शेकडो कोटी रुपयांचा खर्च येणार असल्याचे मत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केले होते. आदित्य ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांनाही हा टॅब भेट दिला होता. त्यांनाही तो आवडला होता. मात्र अजूनही विद्यार्थ्यांना टॅब देण्याच्या योजनेला भाजपाचा सकारात्मक प्रतिसाद लाभलेला नाही.
राज्यातील खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांना द्यायच्या टॅबमध्ये ‘नवनीतह्णकडून अभ्यासक्रम भरून घेतला जातो. आतापर्यंत असे ६५०० टॅब शिवसेना भवनला दिले असून आणखी सुमारे २५ हजार टॅब मागणीनुसार पुरवण्याचे शिवसेनेने ‘नवनीतह्णला कळवले आहे. शिवसेनेच्या खासदार, आमदार, नगरसेवक यांनी हे टॅब खरेदी करून त्यांच्या मतदारसंघातील खासगी मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांना वाटले आहेत. नवनीतकडून शिवसेनेला पुरवण्यात आलेले टॅब साडेसात इंचाचे असून त्यामध्ये वायफाय सुविधा दिलेली आहे.
मुंबई महापालिकेने इयत्ता आठवीतील २२०० विद्यार्थ्यांना टॅबचे वितरण केले आहे. महापालिकेच्या वेगवेगळ््या नऊ माध्यमांच्या शाळा असून त्यापैकी मराठी शाळांमधील केवळ आठवीच्या विद्यार्थ्यांना हे टॅब दिले आहेत. हेच विद्यार्थी नववीत गेल्यावर त्यांना त्या इयत्तेचा अभ्यासक्रम टॅबमध्ये भरून दिला जाणार आहे, असे महापालिकेच्या प्रवक्त्याने सांगितले.

Web Title: No recharges from BJP on Senna's tab!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.