'यंदा अकरावीची संचमान्यता नाही', शिक्षणमंत्र्यांचा शिक्षकांना दिलासा देणारा आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2019 07:00 PM2019-06-25T19:00:56+5:302019-06-25T19:01:36+5:30
शिक्षण विभागातर्फे दरवर्षी संचमान्यता करण्यात येते, त्यानुसार यावर्षी 11 वीची संचमान्यता करावी लागणार होती.
मुंबई - शिक्षक संख्या जास्त ठरू नये म्हणून इयत्ता 11 वी साठी यावर्षी संचमान्यता स्थगित करुन गतवर्षीच्या विद्यार्थी संख्येनुसार अनुज्ञेय असलेले शिक्षक संच देण्यात यावे, असे निर्देश शालेय शिक्षण क्रिडा व युवक कल्याण मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी दिले. सरकारच्या या निर्णयामुळे शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
शिक्षण विभागातर्फे दरवर्षी संचमान्यता करण्यात येते, त्यानुसार यावर्षी 11 वीची संचमान्यता करावी लागणार होती. यावर्षी दहावीचा निकाल पहाता संचमान्यता केल्यास शिक्षकसंख्या अतिरिक्त ठरेल अशी भिती मुंबई ज्युनिअर काँलेज टीचर युनियन या शिक्षक संघटनेने व्यक्त केली होती. तसेच शिक्षक आमदारांनीही याकडे शिक्षणमंत्र्यांचे लक्ष वेधले होते. दरम्यान, आज शालेय शिक्षणमंत्री अॅड आशिष शेलार यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेऊन केवळ एका वर्षासाठी संचमान्यता करण्यास स्थगिती देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता गतवर्षीच्या विद्यार्थी संख्येचा विचार करुन अनुज्ञय असलेला शिक्षकसंच ग्राह्य धरण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे.