मुख्यमंत्र्यांवर कुणाचा ‘रिमोट कंट्रोल’ नको!
By admin | Published: December 2, 2014 04:17 AM2014-12-02T04:17:17+5:302014-12-02T04:17:17+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चांगले काम करायची क्षमता आहे. जर त्यांच्यावर कुणाचा ‘रिमोट कंट्रोल’ नसला तर ते राज्याला देशाचा ‘हेडमास्टर’ बनवतील
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चांगले काम करायची क्षमता आहे. जर त्यांच्यावर कुणाचा ‘रिमोट कंट्रोल’ नसला तर ते राज्याला देशाचा ‘हेडमास्टर’ बनवतील या शब्दांत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सोमवारी अप्रत्यक्षपणे सरकारवरील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रभावावर टीका केली.
नागपुरातील धनवटे नॅशनल कॉलेजमध्ये कार्यक्रमप्रसंगी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. हजारे म्हणाले, पंतप्रधान मोदी हे बोलतात खूप, परंतु कृतीमधून ते प्रत्यक्षात उतरत नाही. परदेशातील बँकांमध्ये असलेला भारतीयांचा काळा पैसा १०० दिवसांत परत आणणे शक्य नाही हे मोदींना माहीत होते. तरीदेखील त्यांनी मतांसाठी खोटी आश्वासने देऊन जनतेची दिशाभूल केली़ मोदींनी आपण पाठविलेल्या पत्राची दखल घेतली नसल्याची खंत अण्णांनी बोलून दाखविली.
सरकारची खुर्ची संकटात आली तरच आंदोलनाची दखल घेतली जाते. त्यामुळे जर एखादा बदल घडवून आणायचा असेल तर जनतेने मोठ्या प्रमाणात संघटित व्हायला हवे, असे ते म्हणाले. जवखेडे येथे झालेल्या दलित हत्याकांडाची त्यांनी निंदा केली. असे प्रकार थांबविण्यासाठी जनतेनेच पुढाकार घेऊन सामाजिक सलोखा वाढवला पाहिजे, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)