'आरक्षण नको, अल्पसंख्याक दर्जा द्या'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2020 03:36 AM2020-02-23T03:36:39+5:302020-02-23T03:36:51+5:30
ब्राह्मण अधिवेशनात एकमुखाने मागणी
कोल्हापूर : ब्राह्मण समाज स्वाभिमानी आहे, त्यांना आरक्षणाची गरज नाही, पण प्रगतीसाठी समाजाला अल्पसंख्याकचा दर्जा देऊन स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा, अशी एकमुखी मागणी कोल्हापुरात भरलेल्या ब्राह्मण अधिवेशनात करण्यात आली. यावर जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी समाजाच्या मागण्या काळजीपूर्वक सोडविल्या जातील, अशी ग्वाही दिली.
आंतरराष्ट्रीय ब्राह्मण परिषदेतर्फे सर्व शाखा ब्राह्मण अधिवेशन कोल्हापुरात सुरू झाले आहे. दोन दिवसाच्या अधिवेशनाचे शनिवारी मंत्री पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले. आमदार ऋतुराज पाटील, ब्राह्मण परिषदेचे अध्यक्ष मकरंद कुलकर्णी, काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पाटील म्हणाले, जात, धर्मात अडकल्याने समाजाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत चालले आहे. एकीकडे देशात आर्थिक परिस्थितीचे गंभीर संकट असताना दुसरीकडे मात्र स्वत: राज्यकर्ते असलेले केंद्र सरकारच विविध कायद्याच्या नावाखाली धार्मिक भावना भडकावण्याचे काम करीत आहे. कमकुवत घटकांना उभे करण्यासाठी राजर्षी शाहू महाराज यांनी वसतिगृहे उभारली. आताही हाच सामाजिक दृष्टिकोन समोर ठेऊन ब्राह्मण समाजाने तळागाळातील लोकांची परिस्थिती सुधारण्यासाठी पुढे यायला हवे.