वरणभात नाही, बिस्कीट नाही की चाॅकलेटही नाही; जन्मापासून फक्त दुधावरच जगतोय १७ वर्षांचा ‘भुजंग’
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 07:32 AM2021-07-27T07:32:46+5:302021-07-27T07:33:52+5:30
वडील गुरुदास व आई सुनीता दोघेही मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.
पी. एस. गोरंतवार
पोंभुर्णा (जि. चंद्रपूर) : वरणभात सोडा, साधे बिस्कीटही न खाता कुणी फक्त दूध पिऊन जगू शकतो का? आश्चर्य आहे खरे; पण सत्यही आहे. जन्मापासून ते आज वयाच्या सतराव्या वर्षापर्यंत तो फक्त दूध आणि दूधच पिऊन जगतो आहे. पोंभुर्णा तालुक्यातील जामखुर्द येथील भुजंग गुरुदास मडावी असे त्याचे नाव आहे. गावकरी त्याला ‘आऊ’ म्हणतात.
भुजंगचा जन्म २३ ऑगस्ट २००५ रोजी झाला. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची. वडील गुरुदास व आई सुनीता दोघेही मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. सामान्यपणे जन्मलेला भुजंग मात्र असामान्य अनुभव देत होता. जन्मानंतर तब्बल १२ दिवस त्याने डोळेच उघडले नव्हते. शिवाय आईचे दूधही प्यायला नाही. बरीच खटपट झाली. शेवटी तेराव्या दिवशी भुजंगने डोळे उघडले व आईचे दूध प्यायला. कुटुंब चिंतामुक्त झाले.
भुजंग सहा महिन्यांचा झाल्यानंतर वरणभात व खिचडी खाऊ घालण्याचा प्रयत्न सुरू झाला; पण अन्नाचा एक कणही त्याने तोंडात घेतला नाही. भूक लागली की, तो फक्त दुधासाठी किंचाळत असे. डॉक्टरांचा सल्ला घेण्यात आला. उपचारही झाले. मात्र, उपयोग झाला नाही. सर्व तपासण्याअंती तो फिट आढळून यायचा. भुजंगची प्रकृती उत्तम असल्याचे डॉक्टर सांगत. सहा वर्षांपर्यंत त्याच्यावर उपचार सुरू होते. आज भुजंग १७ वर्षांचा आहे. दूध हाच त्याचा आहार. पावशेर सकाळी, एक पावशेर संध्याकाळी.
अनेकदा झोपतो उपाशीपोटी
आई-वडील मोलमजुरी करतात; पण गावखेड्यात रोज काम मिळेलच असे नाही. पैशांअभावी अनेकदा भुजंगला दूध मिळत नाही. तेव्हा त्याला रात्री उपाशीपोटी झोपावे लागते; पण तो आई-वडिलांकडे तक्रार करीत नाही. वृद्ध आई-वडिलांचे दारिद्र्य त्याला कळते.
शिक्षण म्हणजे वहीवर रेषा
भुजंगला शाळेतही घातले आहे. पहिली ते सातवीचे शिक्षण जामखुर्द येथेच झाले. आठवीपासून तो देवाडा खुर्द येथील राष्ट्रमाता विद्यालयात शिक्षण घेतो. यावर्षी दहावीत आहे. भुजंगचे शिक्षण म्हणजे वहीवर रेषा ओढून घेणे. शिक्षणाचा संपूर्ण सार तो आपल्या रेषांमध्ये शोधतो. शिक्षकांच्या प्रत्येक शिकवणीत तो ध्यानस्थ बसून असतो. त्याला लिहिता, वाचता, बोलता येत नाही. मात्र, बोललेले सर्व कळते. तो शाळेला ‘बेलम’ व पैशाला ‘खुणाल’ म्हणतो.