रस्ता नाही, पूल नाही; छोट्या नावेने धोकादायक प्रवास! दोन राज्यांच्या कात्रीत अडकला सीमेवरील 20 गावांचा विकास
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2022 08:20 AM2022-04-16T08:20:40+5:302022-04-16T08:20:56+5:30
देशातील मागास जिल्ह्यांच्या यादीत असलेल्या नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याच्या काही भागापर्यंत अजूनही शासनाच्या कोणत्याच योजना पोहोचलेल्या नाहीत.
कौसर खान
सिरोंचा (जि. गडचिरोली) :
देशातील मागास जिल्ह्यांच्या यादीत असलेल्या नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याच्या काही भागापर्यंत अजूनही शासनाच्या कोणत्याच योजना पोहोचलेल्या नाहीत. आर्थिक, सामाजिक विकास तर दूर, या भागातील नागरिकांच्या प्राथमिक गरजाही अजून कोणत्याच शासनाकडून पूर्ण होऊ शकल्या नाहीत. सिरोंचा तालुक्यातील रेगुंठा आणि त्या परिसरातील २० गावांतील नागरिकांना त्याचा खूप मोठा फटका सहन करावा लागतो आहे. एका पुलाअभावी त्यांना गरजेच्या वस्तू, व्यवहार आणि नातेसंबंधासाठी प्राणहिता नदीच्या पात्रातून धोकादायक प्रवास करत पैलतीरावरील तेलंगणा गाठावे लागते.
जिल्हा मुख्यालयापासून २०० ते २५० किलोमीटर आणि सिरोंचा या तालुका मुख्यालयापासून ७० किलोमीटरवर असलेला रेगुंठा परिसर महाराष्ट्राचा भाग आहे. मात्र संस्कृती, परंपरा, भाषा यामुळे त्या भागातील लोक तेलंगणाशीच जास्त जुळले आहेत. गावे विरळ आणि कमी लोकवस्तीची असल्याने त्यांचा आवाज शासन-प्रशासनापर्यंत पोहोचविणारा ‘मसिहा’ कोणी नाही. त्यामुळे त्यांच्या समस्या जाणून घेण्याची आणि त्या दूर करण्याची गरज कोणाला आतापर्यंत वाटली नाही.
२० किलोमीटरसाठी ७० किमीचा भुर्दंड
रेगुंठा व परिसरातील २० गावांमधील नागरिकांसाठी जवळचे शहर म्हणजे तेलंगणातील चेन्नूर, मंचेरियाल, वारंगल किंवा हैदराबाद. प्राणहिता नदीतून गेल्यास अवघ्या २० किलोमीटवर चेन्नूर, ५० किलोमीटरवर मंचेरियाल आहे. पण नदीवर पूल नसल्यामुळे लोक छोट्या नावेने १०० रुपये देऊन तिकीट देऊन पैलतीर गाठतात. रुग्णांना न्यायचे झाल्यास मात्र ७० किलोमीटर अधिक अंतर पार करून सिरोंचामार्गेच जावे लागते. यात वेळ आणि पैसाही खर्च होतो.
दोन्ही राज्यांच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी
रेगुंठा परिसरात कोत्तापल्ली ते तेलंगणातील शेवटचे गाव वेमनपल्ली या दोन गावांना जोडणारा पूल प्राणहिता नदीवर उभारल्यास या परिसरातील नागरिकांच्या अनेक समस्या दूर होऊ शकतात. विशेष म्हणजे या पुलाच्या उभारणीबाबत पाहणी करण्यासाठी तीन ते चार वेळा दोन्ही राज्यातील अधिकाऱ्यांनी येऊन नकाशावरून पाहणी केली. पण आतापर्यंत काहीच झाले नाही, अशी व्यथा रेगुंठा परिसरातील किरण कुर्मा या टॅक्सीचालक युवतीने व्यक्त केली.