रस्ता नाही, डॉक्टर नाही; वेळीच उपचार न मिळाल्याने गेला जीव
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2023 06:30 AM2023-08-07T06:30:16+5:302023-08-07T06:30:30+5:30
शहापुरातील आदिवासी मुलाच्या कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
लोकमत न्यूज नेटवर्क
शहापूर/भातसानगर : शहापूर तालुक्यातील भवर पाडा येथील आठ वर्षीय ओमकार भवर याचा वेळेत उपचार न झाल्याने मृत्यू झाला. गावात रस्ता नसल्याने पायपीट करत त्यास ठाणे वांद्रे येथील आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र, तेथे डॉक्टर नसल्याने त्याच्यावर उपचार झाले नाहीत. यामध्ये खूप वेळ वाया गेला. त्यानंतर त्यास शहापूर येथे उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.
रविवारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तो दुसरीमध्ये शिक्षण घेत होता. रात्री झोपेत असताना तो रडायला लागला आणि तोंडातून फेस आला म्हणून त्याला अघई येथील रुग्णालयात नेण्यात आले.
त्याचे पालक त्याला घेऊन जाण्यासाठी भवरपाडा येथून निघाले. परंतु, गावात रस्ता नसल्याने अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ वांद्रे या गावापर्यंत येण्यासाठी लागला. रुग्णालयात पोहोचण्यासाठी किमान पाऊण तास असा उशीर झाल्याने या आदिवासी मुलाचा मृत्यू झाला.
यासंदर्भात उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल जाधव यांनी सांगितले की, मुलाच्या फुफ्फुसात रक्तस्राव झाला होता. तसेच याआधी इन्फेक्शन झाल्याने त्याचा मृत्यू झाला.
वांद्रे आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी अनुपस्थित
वांद्रे आरोग्य केंद्रावर पोहोचल्यानंतर तेथे कोणीच वैद्यकीय अधिकारी नव्हते. मुक्कामी वैद्यकीय अधिकारी राहत नसल्याने मुलाला १३ किमी अंतरावरील अघई प्राथमिक आरोग्य केंद्रावर दुचाकीवरून नेले. तोपर्यंत पहाटेचे तीन ते चार वाजून गेले होते. त्याला एकदा उलटी झाली आणि तोंडातून फेस निघत होता. अघई येथील वैद्यकीय अधिकाऱ्याने त्याच्यावर प्राथमिक उपचार केले. प्रकृती चिंताजनक झाल्याने शहापूर उपजिल्हा रुग्णालयात पाठविले. सकाळचे साडेपाच वाजून गेले होते.