अनुदानाअभावी बंद होणार नाही कोणतीही शाळा, वर्षा गायकवाड यांची ग्वाही
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2021 09:37 AM2021-12-28T09:37:41+5:302021-12-28T09:38:26+5:30
Varsha Gaikwad : काही कागदपत्रांच्याअभावी अनेक शाळा त्रुटीमध्ये टाकण्यात आल्या आहेत. विनाकारण त्रुटी दाखवल्याने शिक्षकांना नाहक विनावेतनाचा त्रास सहन करावा लागत असल्याबद्दलची लक्षवेधी सूचना काँग्रेस सदस्य सुधीर तांबे यांनी मांडली.
मुंबई : त्रुटीपूर्तता आणि अनुदानाअभावी राज्यातील कोणतीही शाळा बंद होणार नाही, अशी ग्वाही शालेय शिक्षणमंत्रीवर्षा गायकवाड यांनी सोमवारी विधानपरिषदेत दिली.
काही कागदपत्रांच्याअभावी अनेक शाळा त्रुटीमध्ये टाकण्यात आल्या आहेत. विनाकारण त्रुटी दाखवल्याने शिक्षकांना नाहक विनावेतनाचा त्रास सहन करावा लागत असल्याबद्दलची लक्षवेधी सूचना काँग्रेस सदस्य सुधीर तांबे यांनी मांडली. शासनाच्या निर्देशाप्रमाणे ३० दिवसांच्या आत प्रस्ताव दाखल करूनही सहा ते सात महिने उलटले, तरी शाळा व वर्ग तुकड्यांना अनुदान मिळाले नसल्याचे त्यांनी सांगितले. या लक्षवेधीच्या चर्चेत भाई जगताप, अमरनाथ राजूरकर यांनी सहभाग घेतला.
यावर गायकवाड म्हणाल्या की, त्रुटीपूर्तता केलेल्या शाळांना अनुदान देण्याबाबत खर्च करण्यासाठी कोणतीही तडजोड केली जाणार नाही.
अल्पसंख्याक शिक्षण संस्थांचे प्रश्न सोडविणार
अल्पसंख्याक शिक्षण संस्थांचे प्रश्न प्राधान्याने सोडविणार असल्याची माहिती मंत्री गायकवाड यांनी दुसऱ्या एका लक्षवेधीला उत्तर देताना दिली. अल्पसंख्याक संस्थेमध्ये शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांच्या भरतीवरील बंदीमुळे अल्पसंख्याक समाजातील अनेक सुशिक्षित रोजगाराच्या संधीपासून वंचित राहत असल्याचा मुद्दा वजाहत मिर्झा यांनी लक्षवेधीद्वारे मांडला होता.