जागावाटप जाहीर होईना, दिग्गज नेत्यांच्या फक्त बैठकांचा सिलसिला

By दीपक भातुसे | Published: March 26, 2024 05:54 AM2024-03-26T05:54:33+5:302024-03-26T07:00:49+5:30

काही जागांवर महायुती आणि महाविकास आघाडीतील एकापेक्षा जास्त पक्षांनी दावा सांगितल्याने जागावाटप पुढे सरकण्यास तयार नाही.

No seat allocation announced, just a series of meetings with veteran leaders | जागावाटप जाहीर होईना, दिग्गज नेत्यांच्या फक्त बैठकांचा सिलसिला

जागावाटप जाहीर होईना, दिग्गज नेत्यांच्या फक्त बैठकांचा सिलसिला

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून उमेदवारी अर्ज भरण्यास केवळ दोन दिवस शिल्लक आहेत, तरीही महायुती आणि महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा कायम आहे.
काही जागांवर महायुती आणि महाविकास आघाडीतील एकापेक्षा जास्त पक्षांनी दावा सांगितल्याने जागावाटप पुढे सरकण्यास तयार नाही.

काही जागांवर बंडखोरी शमवण्याचे प्रयत्न सुरू असून त्यासंदर्भातही बैठकांचा सिलसिला सुरू आहे. महायुतीला तीन मतदारसंघांत बंडखोरीची डोकेदुखी भेडसावत असून त्यासंदर्भात बैठका होऊनही तोडगा निघू शकलेला नाही. त्यामुळे नुसत्याच चर्चा पण काेणाचेही काहीच ठरेना, अशी स्थिती आहे. 

जागावाटपाचा तिढा सोडवण्याबरोबरच प्रकाश आंबेडकरांसंदर्भात निर्णय घेण्यासाठी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस (पवार गट) आणि शिवसेना (ठाकरे गटाची) मातोश्रीवर महत्त्वाची बैठक झाली. राष्ट्रवादीकडून स्वतः शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आ. सुनील भुसारा तर शिवसेनेकडून उद्धव ठाकरे, संजय राऊत उपस्थित होते. त्यानंतरही जागांच्या फॉर्म्युल्याची घोषणा झाली नाही.

सर्वपक्षीय वरिष्ठांना बंडखोरीची डोकेदुखी 
महाविकास आघाडीत बारामती, नगर, नाशिक, सातारा या मतदारसंघांत मित्रपक्षांच्या बंडखोरीच्या पवित्र्यामुळे महायुतीची डोकेदुखी वाढली आहे. ही बंडखोरी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार स्वतः प्रयत्न करत आहेत. नगरमध्ये विखे-पाटील विरुद्ध राम शिंदे या भाजप नेत्यांनी तर, बारामतीत शिंदे गटाचे विजय शिवतारे यांनी अजित पवारांविरोधात दंड थोपटले आहेत. नाशिक मतदारसंघावर शिंदे गट आणि भाजपच्या स्थानिक आमदारांनी दावा सांगितला आहे, तर साताऱ्यातून राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर उदयनराजेंना लढू देणार नाही, असा पवित्रा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतला आहे.

अजित पवार गट सहा जागांवर ठाम
बारामती, सातारा, रायगड, शिरुर या चार जागांव्यतिरिक्त धाराशिव आणि परभणी यासह सहा जागा मिळाव्यात, असा राष्ट्रवादी काँग्रेसचा ठाम आग्रह आहे. बुलढाणा, नाशिक या जागांसाठीही राष्ट्रवादीने आग्रह धरला आहे. मात्र, या जागा मिळाल्या नाहीत तरी चालेल, अशी पक्षाची भूमिका असल्याचे समजते. महाराष्ट्राबाहेर राष्ट्रवादीला लक्षद्वीपची जागा मिळणार आहे. 

जानकर बारामतीतून?
रासपचे महादेव जानकर महायुतीबरोबर आल्याने त्यांना एक जागा दिली जाणार आहे. ही जागा परभणी की बारामती याबाबत चर्चा सुरू झाली आहे. बारामतीमध्ये तीन दिवस अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा प्रचार थंडावल्याने या जागेवर जानकर निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे.

 

Web Title: No seat allocation announced, just a series of meetings with veteran leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.