Rohit Pawar: 'माजी नेत्यांची सुरक्षा काढण्याचा पंजाब सरकारचा निर्णय स्वागतार्ह, महाराष्ट्रातही असा विचार व्हावा'-रोहित पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2022 03:20 PM2022-03-13T15:20:33+5:302022-03-13T15:23:24+5:30
Rohit Pawar: पंजाबचे आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी पंजाबमधील माजी मंत्री आणि आमदारांची सुरक्षा काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई:पंजाबचे मुख्यमंत्री होण्यापूर्वीच आम आदमी पार्टीचे नेते भगवंत मान (Bhagwant Mann) यांनी मोठा निर्णय घेतला आहे. भगवंत मान यांनी सर्व माजी मंत्री आणि आमदारांची सुरक्षा काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. भगवंत मान यांनी शनिवारी पंजाब काँग्रेसचे प्रमुख नवज्योतसिंग सिद्धू यांच्यासह जवळपास 122 नेत्यांची सुरक्षा काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही माजी मंत्री-आमदारांची सुरक्षा काढावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केली आहे.
राज्यातील पावणेतीन कोटी लोकांना सुरक्षेची गरज आहे, पोलीस ठाणे ओस पडले आहेत. त्यामुळे काही लोकांच्या सुरक्षेपेक्षा मला पंजाबच्या जनतेची सुरक्षा महत्त्वाची वाटते, असे म्हणत भगवंत मान यांनी माजी नेत्यांची सुरक्षा काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावरुन आता रोहीत पवार यांनीही अशाच प्रकारची मागणी केली आहे.
माजी मंत्री, आमदार यांची सुरक्षा काढण्याचा पंजाबचे नियोजित मुख्यमंत्री भगवंत मान यांचा निर्णय स्वागतार्ह आहे. यामुळं पोलिसांवरचा ताण कमी होऊन विविध गुन्ह्यांच्या तपासाला मदत होणार असेल तर राज्यातही अशा प्रकारे नेत्यांच्या सुरक्षेचा फेरआढावा घेण्याबाबत विचार व्हावा!@Dwalsepatil
— Rohit Pawar (@RRPSpeaks) March 13, 2022
काय म्हणाले रोहित पवार?
''माजी मंत्री, आमदार यांची सुरक्षा काढण्याचा पंजाबचे नियोजित मुख्यमंत्री भगवंत मान यांचा निर्णय स्वागतार्ह आहे. यामुळे पोलिसांवरचा ताण कमी होऊन विविध गुन्ह्यांच्या तपासाला मदत होणार असेल, तर राज्यातही अशा प्रकारे नेत्यांच्या सुरक्षेचा फेरआढावा घेण्याबाबत विचार व्हावा'', असं रोहित पवार म्हणाले.
या नेत्यांची सुरक्षा गेली?
पंजाबमध्ये मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या या निर्णयानंतर नवज्योत सिंग सिद्धू यांच्यासह त्यांची पत्नी नवज्योत कौर, मनप्रीत सिंग बादल, भारतभूषण आशू, रझिया सुलताना, परगट सिंग, राणा गुरजीत सिंग, सुखबिंदर सिंग सरकारिया, संजय तलवार, नथू राम, दर्शन लाल, धरमबीर अग्निहोत्री, अरुण नारंग, तरलोचन अशा एकूण 122 नेत्यांची सुरक्षा जाणार आहे. या यादीनुसार राजा वडिंग यांच्याजवळ सर्वाधिक सुरक्षा आहे. माजी नेत्यांच्या सुरक्षेतील 369 पोलीस कर्मचारी आणि कमांडोना हटवण्यात येणार आहे. मात्र, दुसरीकडे न्यायालयाच्या आदेशानुसार ज्यांना सुरक्षा पुरवण्यात आली आहे, ती तशीच कायम राहणार आहे.