ओबीसी आरक्षणास धक्का नाही, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ओबीसी नेत्यांना शब्द; जातजनगणनाही करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2023 06:08 AM2023-11-08T06:08:40+5:302023-11-08T07:10:42+5:30
मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन मराठा समाजाची मागील दाराने ओबीसीत एन्ट्री होत असल्याचे वक्तव्य मंत्री छगन भुजबळ यांनी केल्यानंतर ओबीसी समाजामध्ये अस्वस्थता आहे.
मुंबई : मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही, असा शब्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी शिष्टमंडळाला दिला. मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन मराठा समाजाची मागील दाराने ओबीसीत एन्ट्री होत असल्याचे वक्तव्य मंत्री छगन भुजबळ यांनी केल्यानंतर ओबीसी समाजामध्ये अस्वस्थता आहे.
या पार्श्वभूमीवर माजी आमदार प्रकाश शेंडगे यांच्यासह ओबीसी नेत्यांनी फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी जातीनिहाय जनगणनेबाबतही चर्चा झाली. बिहारमधील जातीनिहाय जनगणनेत त्रुटी आहेत. मात्र, राज्यात पारदर्शकपणे जातीनिहाय जनगणना केली जाईल, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले. ओबीसींच्या मागण्यांबाबत फडणवीसांनी सकारात्मक भूमिका घेतल्याचे शेंडगे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
शिंदे समितीला आव्हान देणार
शिष्टमंडळाने मंत्री छगन भुजबळ यांचीही भेट घेत त्यांच्या भूमिकेचे समर्थन केले. न्या. संदीप शिंदे समितीच्या मराठा कुणबी सर्वेक्षणाला विरोध करून शिंदे समितीच्या कामाला स्थगिती द्यावी, अशी याचिका न्यायालयात दाखल करण्याचे ठरले. १७ तारखेला अंबड येथे ओबीसी मेळावा होणार असून, २६ नोव्हेंबरला हिंगोली येथे मेळावा होणार आहे.
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद?
बुधवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. या बैठकीत मंत्री भुजबळ यांनी घेतलेल्या भूमिकेचे पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत. शिंदे गटाने पूर्णपणे भुजबळांच्या भूमिकेविरोधात भूमिका घेतली आहे.
ओबीसी समाजाच्या बैठकीत ‘ओबीसी किंवा अन्य समाजाला धक्का न लावता मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देणार,’ अशी भूमिका सरकारने मांडली होती. त्यामुळे कुणीही ओबीसी समाजात संभ्रम निर्माण करू नये. कुणबी दाखल्यावर शिंदे समिती काम करत आहे. -एकनाथ शिंदे,
मुख्यमंत्री
सरकारमधील दोन मंत्रीच आरक्षणावर वेगवेगळी विधाने करत आहेत. सरकारमध्ये एकवाक्यता दिसत नाही. - नाना पटोले,
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष