आमदारांच्या गावातच नाही एसटी बस
By admin | Published: July 5, 2017 02:46 AM2017-07-05T02:46:10+5:302017-07-05T02:46:10+5:30
राहू ते दौंड एसटीसेवा सुरु करण्याची राहूबेटवासीयांची मागणी कागदावरच राहिल्याने दौंड एसटी सेवेच्या कामकाजाबाबत प्रवासी वर्गामधून
लोकमत न्यूज नेटवर्क
राहू : राहू ते दौंड एसटीसेवा सुरु करण्याची राहूबेटवासीयांची मागणी कागदावरच राहिल्याने दौंड एसटी सेवेच्या कामकाजाबाबत प्रवासी वर्गामधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, राहू हे आमदार राहुल कुल यांचे गाव आहे. एसटीसेवा नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
राहू ते दौंड अंतर ६५ किलोमीटरच्या जवळपास असून या राहूपासून बेटातील बहुतेश गावे ही दहा किलोमीटरच्या अंतरावर आहेत. बेट परिसरातील ग्रामस्थांना दौंड शहराशी व दौंड हे तालुक्याचे ठिकाण असल्याने न्यायालयीन कामकाज तहसील कचेरी, पंचायत समिती, कृषी विभाग कार्यालय ही महत्त्वाची कार्यालयीन कामकाज करण्यासाठी राहूबेट परिसरातील ग्रामस्थांना पर्यायी वाहनाचा आधार घ्यावा लागत असतो.
वाहने वेळेवर न भेटल्याने शासकीय कामे वेळेवर होत नसल्याने विनाकारण वेळ आणि खर्च वाया जातो. राहू वरुन सकाळी साडेआठ वाजता तर दौंडवरुन राहू मुक्कामी येणारी एसटी बस ही ६ वाजता दौंड डेपोवरुन सोडण्यात यावी अशी मागणी पसिरातील ग्रामस्थांची आहे. त्यात परिसरात शैक्षणिक सुविधा नसल्याने बहुतेक विद्यार्थ्यांना खुटबाव, केडगाव, बारामती याठिकाणी जावे लागत आहे. एसटी सेवा तात्काळ सुरु करण्याची गरज विद्यार्थी वर्गातून पुढे येत आहे. याबाबत दौंड डेपोचे प्रमुख किशोर पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, दौंड ते राहू या गाडीला उत्पन्न नसल्यामुळे ही गाडी बंद करण्यात आली आहे. दौंड डेपोमध्ये कर्मचाऱ्यांचे प्रमाण कमी असले तरी सेवा देण्याचा आमचा प्रयत्न असतो. गाड्या जरी खराब असल्या तरी त्या दुरुस्त करुन प्रवाशांना सेवा देण्यासाठी आणि नेहमीच प्रयत्न करत असतो.
कर्मचाऱ्यांचा अभाव : डेपोत नादुरुस्त बसच जास्त
दौंड एसटी डेपोच्या वापरात ३0 एसटी बस असल्याचे समजते, त्यापैकी काही एसटी बस या नादुरुस्त झाल्याने वर्कशॉपमध्येच असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे, तर कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे काही एसटी गाड्या रद्द कराव्या लागत असल्याची वस्तूस्थिती आहे.
त्यापैकी काही कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत, तर काही सेवानिवृत्त झाले आहेत. परंतु, त्या जागेवर अद्याप कर्मचारी भरले नाहीत. बहुतेक वेळा एसटी नादुरुस्त झाल्यामुळे रस्त्यावरच प्रवाशांना पर्यायी वाहने शोधून प्रवास करावा लागल्याने त्यांचा वेळ आणि खर्च वाया जातो.