एकही शिक्षक अतिरिक्त होणार नाही
By admin | Published: December 2, 2014 11:05 PM2014-12-02T23:05:19+5:302014-12-02T23:17:48+5:30
विनोद तावडे : माध्यमिक अध्यापक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाला आश्वासन
टेेंभ्ये : सध्या राज्यामध्ये सुरु असणाऱ्या सन २०१३-१४च्या संचमान्यतेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील एकही शिक्षक अतिरिक्त होणार नसल्याचे आश्वासन शालेय शिक्षणमंत्र्यांनी माध्यमिक अध्यापक संघाच्या शिष्टमंडळाला दिले. ते रत्नागिरी दौऱ्यावर असताना रत्नागिरी जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली. यावेळी ते बोलत होते. राज्यातील सर्व अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिक्षणसेवकांच्या प्रश्नाबाबत विचारले असता शिक्षणसेवकांची सेवा समाप्त केली जाणार नाही. त्यांना सेवा संरक्षण देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शिक्षणमंत्री विनोद तावडे नुकतेच जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी रत्नागिरी जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाचे अध्यक्ष भारत घुले, सचिव अशोक आलमान, सदाशिव चावरे, सी. एस. पाटील, आत्माराम मेस्त्री, एम. आर. पाटील व अन्य सदस्यांच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली. यावेळी संघटनेच्यावतीने त्यांना निवेदन देण्यात आले. यामध्ये काही प्रमुख मागण्या शिक्षण मंत्र्यांसमोर ठेवण्यात आल्या. त्यामध्ये कोकण विभागासाठी उपसंचालक कार्यालय स्वतंत्र करावे, कोकणासाठी पटसंख्येचे वेगळे निकष तयार करण्यात यावेत, अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन होईपर्यंत त्यांचा पगार मूळ आस्थापनेतून काढण्यात यावा, विनाअट निवडश्रेणी देण्यात यावी, शिक्षक संख्येचा निकष पूर्वीप्रमाणेच वापरला जावा, राज्य पुरस्कारप्राप्त सन २००७ पासून सर्वच शिक्षकांना १ लाख रुपये प्रोत्साहन अनुदान देण्यात यावे, शिक्षणसेवकांना सेवा संरक्षण मिळावे, अनुदानास पात्र शाळांमधील पूर्वीच्या कर्मचाऱ्यांबाबतीत आरक्षणाच्या अटी शिथील कराव्यात, नव्याने अनुदान मंजूर झालेल्या शाळांचे पुनर्मुल्यांकन करु नये, या मागण्यांचा समावेश आहे. याबाबत सविस्तर चर्चा केली. (वार्ताहर)
शाळा बंद होणार नाहीत?
विद्यार्थीसंख्येच्या नवीन निकषांमुळे अनेक शाळा बंद होण्याची परिस्थिती राज्यामध्ये निर्माण झाली आहे. याबाबत राज्य शासन गांभीर्याने विचार करीत आहे. शाळा बंद होणार नाहीत, यादृष्टीने आवश्यक ते सर्व प्रयत्न राज्य शासन करणार आहे. राज्यातील शाळा बंद करण्याच्या विरोधात शासन असल्याचे शिक्षणमंत्र्यांनी जाहीर केले. यामुळे खरोखरच शाळा बंद होणार नाहीत का? याबाबत विविध स्तरावर चर्चा होत आहे.