अकरावी प्रवेशाचे ‘नो टेन्शन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2016 01:17 AM2016-06-11T01:17:33+5:302016-06-11T01:17:33+5:30
दहाव्या वर्गाचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाचे वेध लागले आहे.
जिल्हाभरात १३५ तुकड्या : उत्तीर्ण विद्यार्थी १४ हजार ९२७, कमाल प्रवेश क्षमता १८ हजार ८००
गडचिरोली : दहाव्या वर्गाचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाचे वेध लागले आहे. जिल्ह्याचा निकाल सुमारे ८७.९७ टक्के लागला आहे. त्यामुळे अकरावीला प्रवेश मिळणार नाही की, नाही, अशी शंका विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण होण्यास सुरूवात झाली आहे. मात्र उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत जिल्हाभरात अकरावीच्या प्रवेशीत जागा जास्त असल्याने प्रवेशासाठी टेन्शन घेण्याची वेळ विद्यार्थ्यांवर येणार नसल्याचे सध्या तरी दिसून येत आहे.
दहावीच्या परीक्षेत जिल्हाभरातून एकूण १४ हजार ९२७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. गडचिरोली जिल्ह्यात एकूण १६३ महाविद्यालये आहेत. या महाविद्यालयांमध्ये कला शाखेच्या एकूण १७० तुकड्या, विज्ञान शाखेच्या ६० तुकड्या व वाणिज्य शाखेच्या ५ अशा एकूण २३५ तुकड्या आहेत.
प्रत्येक तुकडीत सुरूवातीला ६० विद्यार्थ्यांना प्रवेश देता येतो. मात्र विद्यार्थ्यांची संख्या वाढल्यास माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या परवानगीनंतर आणखी २० विद्यार्थ्यांना प्रवेश देता येते. म्हणजेच प्रत्येक तुकडीत कमाल ८० विद्यार्थी प्रवेशीत होऊ शकतात.
या गणिताप्रमाणे गडचिरोली जिल्ह्यात अकरावीच्या प्रवेशीत जागांची संख्या १८ हजार ८०० एवढी आहे. उत्तीर्ण होणार विद्यार्थ्यांच्या तुलनेत ती ३ हजार ८७३ ने जास्त आहे. त्यामुळे निकाल जरी जास्त लागला असला तरी प्रत्येक विद्यार्थ्याला प्रवेश मिळेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
दहावीनंतर विद्यार्थी आपापल्या आवडीप्रमाणे अभ्यासक्रम व शाखांची निवड करतात. पुढे त्याच शाखेत उच्च शिक्षण घेऊन करिअर करीत असल्याने अकरावी प्रवेशाचे विशेष महत्त्व आहे. मागील दोन वर्षांपासून दहावीच्या निकालामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे कधीकधी प्रवेश मिळण्यास अडचणी निर्माण होतात. मात्र गडचिरोली जिल्ह्यात यावर्षी अकरावीच्या प्रवेशासाठी अडचण जाणार नाही. (नगर प्रतिनिधी)
विज्ञान शाखेकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत चालला आहे. गडचिरोली जिल्ह्यात विज्ञान शाखेच्या एकूण ६० तुकड्या आहेत. या तुकड्यांमध्ये विद्यार्थ्यांची कमाल प्रवेशीत संख्या ४ हजार ८०० एवढी आहे. मात्र बहुतांश विद्यार्थी विज्ञान शाखेसाठीच प्रवेश घेण्यास इच्छुक राहत असल्याने विज्ञान शाखेसाठी गर्दी होण्याची शक्यता यावर्षीसुध्दा नाकारता येत नाही. त्यातही नामांकित महाविद्यालय असेल तर आणखी गर्दी वाढण्याची व काही विद्यार्थ्यांना वेटींगवर राहावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकेकाळी गर्दी खेचणाऱ्या कला महाविद्यालयांचे मात्र भविष्य धोक्यात आले आहे. मागील दोन वर्षांपासून प्राथमिक शिक्षकांप्रमाणेच कला शाखेच्या प्राध्यापकांनाही विद्यार्थ्यांसाठी शोधमोहीम राबवावी लागत आहे.
३ हजार ८७३ जागा अतिरिक्त
दहावीच्या परीक्षेत एकूण १४ हजार ९२७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सर्वच महाविद्यालयांची कमाल प्रवेशीत क्षमता १८ हजार ८०० एवढी आहे. त्यामुळे उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत ३ हजार ८७३ जागा अतिरिक्त आहेत. त्यातीलही काही विद्यार्थी पॉलिटेक्निक, आयटीआय व इतर अभ्यासक्रमांना प्रवेश घेतात. त्यामुळे प्रवेशीत विद्यार्थ्यांची संख्या आणखी कमी होते.