टॉयलेटची सोय नाही, कपडे बदलण्यासाठी खोली नाही; एका परिचारिकेनं व्यथा मांडली.‘फेसबुक’च्या माध्यमातून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2020 06:50 PM2020-04-17T18:50:42+5:302020-04-17T18:56:24+5:30
ड्यूटी संपवून घरी आल्यावर तर फार मोठी जबाबदारी. मुलीला डेटॉलचे पाणी, साबण व सॅनिटायझर घेऊन बिल्डिंगखाली बोलवायचे. आधी हातपाय, शूज, गाडी स्वच्छ धुवायची. दरवाजा उघडा असायचा. गाडीची चावी, मोबाईल, चष्मा, पेन व आयकार्ड सर्व एका बॉक्समधे टाकायचे आणि बाथरूममध्ये पळायचे.
कोल्हापूर : टायलेटसाठी सोय नाही आणि अंगावरचे पीपीई किट काढायचे म्हटले तरी स्वतंत्र खोली नाही. आधी किटच नव्हते. समोर उभारलेला रुग्ण कोरोनाबाधित आहे का हेदेखील माहिती नसायचं. काचेच्या दरवाजावर ब्लॅँकेट टाकून, खाली बसून कपडे बदलायची वेळ. गेले महिनाभर कोरोनाच्या लढाईत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या येथील सीपीआर रुग्णालयामधील परिचारिकांची ही प्रातिनिधिक व्यथा आहे. एका परिचारिकेनं ती ‘फेसबुक’च्या माध्यमातून मांडलेली.
ही परिचारिका म्हणते, सुरुवातीला आम्हाला किट दिले नव्हते. मलाही त्याचं काही वाटलं नाही. घरी आल्यावर मात्र जागतिक आरोग्य संघटनेने दिलेली माहिती वाचली आणि पायांखालची जमीन हादरलीच. दुसºया दिवशी किट दिल्याशिवाय काम करणार नाही, असं सांगितल्यावर किट मिळालं. बिनमापाचं. कशीबशी स्वत:ला त्या किटमधे फिट केले. किटमुळे प्रचंड गरम होत होते. फॅनची सोय नव्हती. तोंडावर ए-९५ मास्क घातलेला. तो घट्ट बसावा म्हणून त्याला लावलेले रबर कानाला रुतत होते. नाक पूर्ण बंद केल्याने व अशा मास्कची सवय नसल्याने प्रचंड गुदमरत होते. रुग्णतपासणी, त्यांच्या हातावर शिक्के मारणे, डॉक्टरांना बोलावणे अनेक कामे करावी लागत. किटमुळे पाणीही पिता येत नव्हते.
ड्यूटी संपवून घरी आल्यावर तर फार मोठी जबाबदारी. मुलीला डेटॉलचे पाणी, साबण व सॅनिटायझर घेऊन बिल्डिंगखाली बोलवायचे. आधी हातपाय, शूज, गाडी स्वच्छ धुवायची. दरवाजा उघडा असायचा. गाडीची चावी, मोबाईल, चष्मा, पेन व आयकार्ड सर्व एका बॉक्समधे टाकायचे आणि बाथरूममध्ये पळायचे. बॅग, कपडे, युनिफॉर्म सर्व गरम पाण्यानी धुवायचे; डेटॉलमधे भिजत ठेवायचे व डोक्यावरून अंघोळ करूनच बाहेर पडायचे. कपडे कडक उन्हात सुकत घालायचे. मोबाईलला सॅनिटायझर लावून स्वच्छ करायचे. हात साबणाने धुवायचा. मग एका रूममधे सोफ्यावर वेगळं बसायचं.
तहानेने जीव व्याकुळ व्हायचा. तांब्याभर पाणी प्यायल्यावर जेवायची इच्छाच व्हायची नाही; पण प्रतिकारशक्ती शाबूत ठेवण्यासाठी जे घरच्यांनी बनवलंय ते खायचं व दुसºया दिवशीपर्यंत वेगळंच बसायचं. मुलांच्या जवळ जायचे नाही की मुलांना जवळ येऊ द्यायचे नाही. शरीराने नव्हे तर मनावर असलेल्या प्रचंड तणावामुळेच थकायला व्हायचे. आठवडाभर बिल्डिंगमधील कोणीही दिसले नाही. जे दिसले ते बघून पटकन दूर जायचे. घरच्यांना टेन्शन नको म्हणून चेहºयावर हसू ठेवायचं.
तुम्ही तेवढे नियम पाळा ही विनंती
गेल्या आठवड्यात सरकारने आपत्कालीन कर्मचाऱ्यांना विम्याची घोषणा केली व या आठवड्यात फॉर्म आले देखील. पहिल्याच पानावर नाव व बाकीची माहिती झाल्यावरचा मृत्यूचा दिनांक व वेळ हा कॉलम भरताना डोळ्यांत पाणी आलं. मुलीकडे सही करण्यासाठी फॉर्म दिला तर ती म्हणाली, ‘नको हा विमा आपल्याला. तू नोकरी सोड.’ पण मी भारतीय आहे. माझे हे कर्तव्य आहे. या भावनेतून मी काम करत आहे. तुम्हीही नियमांचे पालन करा, घरात थांबा. कोरोनाला आपण हरवूया. असं आवाहनदेखील या परिचारिकेने शेवटी केले आहे.