शौचालय नसल्याने सरपंचाचे सदस्यत्व रद्द
By Admin | Published: June 1, 2017 02:22 AM2017-06-01T02:22:18+5:302017-06-01T02:22:18+5:30
घरात शौचालय नसल्याने व सरकारी जागेत अतिक्रमण करून घराचे बेकायदा बांधकाम केल्याने वडगाव कातवी ग्रामपंचायतच्या
लोकमत न्यूज नेटवर्क
वडगाव मावळ : घरात शौचालय नसल्याने व सरकारी जागेत अतिक्रमण करून घराचे बेकायदा बांधकाम केल्याने वडगाव कातवी ग्रामपंचायतच्या सरपंच अर्चना भोकरे यांचे सदस्यत्व प्रभारी जिल्हाधिकारी रमेश काळे यांनी रद्द केले आहे. याबाबत भाजपाचे ग्रामपंचायत सदस्य किरण भिलारे यांनी ११ जानेवारी २०१७ रोजी सरपंच भोकरे यांच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती.
प्रभारी जिल्हाधिकारी काळे यांनी दोन्ही बाजूकडून सादर करण्यात आलेले पुरावे, दोन्ही बाजूकडून झालेला युक्तिवाद, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना प्राप्त झालेला अहवाल व शौचालय नसल्याने तसेच त्यांनी सार्वजनिक शौचालयाचा वापर करत असल्याबाबत ग्रामसभा ठरावाद्वारे प्रमाणित करून प्रमाणपत्र सादर केले नाही आदी बाबी लक्षात घेऊन मंगळवारी त्यांना ग्रामपंचायत सदस्यपदी कार्यरत राहण्यास अपात्र ठरवण्याचा आदेश दिला.
मावळातील श्रीमंत व प्रतिष्ठेची मानली जाणाऱ्या वडगाव ग्रामपंचायतमध्ये भोकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने नाट्यमयरित्या राष्ट्रवादी व काँग्रेसच्या शहर विकास समितीने सत्ता स्थापित केली. भाजपाच्या तिकिटावर निवडून आलेल्या भोकरे यांनी सरपंचपदाच्या निवडणुकीच्या एक दिवस आधी राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश केल्यामुळे सत्ताधारी भाजपाची कोंडी झाली होती. याचे शैल्य मनात ठेवून भाजप सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती. भोकरे यांचे सदसत्व रद्द झाल्याने भाजपा कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला.
जिल्हाधिकारी यांच्या निर्णयाची प्रत मला अजून भेटली नाही. त्यामुळे पुढे काय निर्णय घायचा ते प्रत मिळाल्यावरच ठरवू. त्यामुळे या विषयावर मी आता काहीही बोलणे उचित ठरणार नाही, असे अर्चना भोकरे यांनी सांगितले.