‘कायद्याचे उल्लंघन नाही’
By admin | Published: October 6, 2015 02:50 AM2015-10-06T02:50:50+5:302015-10-06T02:50:50+5:30
स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु राधे माँने जादुटोणा कायद्याचे उल्लंघन केल्याचे कोणतेच पुरावे हाती आलेले नाहीत, अशी माहिती सोमवारी पोलिसांनी उच्च न्यायालयाला दिली.
मुंबई: स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु राधे माँने जादुटोणा कायद्याचे उल्लंघन केल्याचे कोणतेच पुरावे हाती आलेले नाहीत, अशी माहिती सोमवारी पोलिसांनी उच्च न्यायालयाला दिली.
‘तक्रारदार, साक्षीदार आणि संशयित यांचे जबाब नोंदवल्यानंतर आणि सुखविंदर कौर उर्फ राधे माँच्या घरावर धाड टाकल्यानंतर तिने जादुटोणा कायद्याचे उल्ल्ांघन केल्याचे स्पष्ट झाले नाही,’ असे पोलिसांनी सोमवारी न्या. व्ही. एम. कानडे व न्या. शालिनी फणसाळकर-जोशी यांच्या खंडपीठाला सांगितले.
अश्लील वर्तन केल्याबद्दल राधे माँवर एफआयआर नोंदवण्याचे आदेश पोलिसांना द्यावेत, यासाठी फाल्गुनी ब्रम्हभट्ट यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेच्या सुनावणीवेळी पोलिसांनी खंडपीठापुढे प्रतिज्ञापत्र सादर केले.‘ब्रम्हभट्ट यांच्यासह राधे माँचाही जबाब नोंदवला आहे. डॉली बिंद्रा यांनी केलेल्या तक्रारीवरही एफआयआर नोंदवण्यात आली आहे. या केसमध्ये ब्रम्हभट्ट साक्षीदार असतील.राधे माँच्या निवासस्थानाची झडती घेण्यात आली, पण काहीही आक्षेपार्ह आढळले नाही,’ असे पोलिसांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.