निवडणुकीतून माघार पण राजकारणातून निवृत्ती नाही : गणपतराव देशमुख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2019 04:02 PM2019-08-03T16:02:00+5:302019-08-03T16:04:33+5:30
विधानसभा निवडणूक लढविणार नसल्याचे आमदार गणपतराव देशमुख यांनी केले स्पष्ट
सांगोला : निसर्ग नियमांचा संकेत मान्य करून २०१९ च्या विधानसभा निवडणुकीतून आपण माघार घेतली आहे़ तरीही दुष्काळी सांगोला तालुका विकासाचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत राजकारण व समाजकारणातून निवृत्ती घेणार नसल्याचे आ़ गणपतराव देशमुख यांनी पत्रकारांशी संवाद साधताना स्पष्ट केले.
लोकसभा निवडणुकीत देशात भाजपने स्पष्ट बहुमत मिळविले. परंतु त्यांनी या निवडणुकीत ७० वर्षांहून अधिक वय झाल्याने ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी व सुमित्रा महाजन यांना विश्रांती दिली. वाढत्या वयामुळे डोळ्यांना पूर्वीसारखे स्पष्ट दिसत नाही. कानालाही कमी ऐकू येते. देशाच्या व राज्याच्या निवडणुकीत ९३ वर्षांचा उमेदवार आजपर्यंत पाहिला आहे का ?
२०१४ च्या निवडणुकीतच आपण हा निर्णय घेणार होतो. परंतु कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर निवडणुकीला सामोरे गेलो. चालू वर्षीही कार्यकर्त्यांनी आग्रह केल्यास कार्यकर्त्यांची समजूत काढून सर्वानुमते शेतकरी कामगार पक्षाचा उमेदवार निश्चित करू आणि सर्वांनी मनापासून त्याचे काम करून सांगोल्यातून पुन्हा एकदा शेकापचाच उमेदवार निवडून आणू़ शेकापचा बालेकिल्ला अभेद्य राखू, असेही त्यांनी सांगितले.
वाढत्या वयामुळे दुष्काळी सांगोला तालुक्याचे प्रलंबित प्रश्न विधानसभेत प्रभावीपणे मांडता येणार नाहीत. आपल्या कार्यकाळात शिरभावी प्रादेशिक नळपाणीपुरवठा टेंभू-म्हैसाळ योजना यासह अनेक योजना मार्गी लावल्या. अंतिम टप्प्यात असलेली विकासकामे पूर्ण करण्यासाठी शेकापची धुरा नवीन उमेदवाराकडे देऊन आपण मार्गदर्शकाची भूमिका पार पाडणार असल्याचेही ते म्हणाले.
तत्त्वनिष्ठा हेच यशाचे गमक
१९६२ पासून महाराष्ट्राच्या राजकारणात आपण सक्रिय आहोत. माझ्या कार्यकाळात अनेक आमिषे, प्रलोभने आली. परंतु मी त्याला कधीही बळी पडलो नाही. स्वत:ची तत्त्वे कधीच सोडली नाहीत. १९६२ पासून सध्या शेकापला मतदान करणारी ही तिसरी पिढी आहे. शेकाप कार्यकर्त्यांचा संचच आपले भांडवल आहे व तत्त्वनिष्ठा हेच आपल्या यशाचे गमक असल्याचे आ़ गणपतराव देशमुख यांनी सांगितले़