युतीच्या जागावाटपाबाबत सेनेला कोणताही शब्द दिलेला नाही!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2019 06:47 AM2019-08-02T06:47:43+5:302019-08-02T06:49:09+5:30
जागा वाटपाबाबत अमित शहांची राज्यातील नेत्यांना सूचना
हरिश गुप्ता
नवी दिल्ली : आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना यांनी नेमक्या किती किती जागा लढवायच्या आहेत, याचा कोणताही शब्द शिवेसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिला गेलेला नाही. शिवसेनेबरोबरचे जागा वाटपाशी संबंधित मुद्दे निकाली काढा, असे भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेत्यांनी राज्यातील भाजपला सांगितले आहे. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना शिवसेना व इतर पक्षांबरोबर जागा वाटपाची बोलणी किंवा वाटाघाटी तुम्ही करायची आहे, हे स्पष्टपणे कळवले आहे.
अमित शहा यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे यांची मुंबईत ‘मातोश्री’वर भेट घेतली होती व या भेटीत विधानसभा निवडणुकीबाबत कोणताही शब्द दिला नव्हता. तेव्हा झालेली बोलणी ही फक्त लोकसभेच्या किती जागा लढवायच्या एवढ्यापुरतीच मर्यादित होती. शिवसेनेने लोकसभेसाठी २३ जागा मागितल्या होत्या व त्या मान्यही झाल्या होत्या. ठाकरे यांना त्याचवेळी विधानसभा निवडणुकीसाठीही जागांची चर्चा करायची होती. परंतु, तशी काही चर्चा झाली नाही, असे भाजपच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले. लोकसभा निवडणुकीपूर्वी कोणतेही मतभेद होऊ नयेत, असे भाजपला हवे होते. त्यामुळे शिवसेनेच्या सगळ््या मागण्या मान्य केल्या गेल्या. परंतु, विधानसभा निवडणुकीसाठी पक्ष श्रेष्ठींनी जागा वाटपाचा प्रश्न कसा सोडवायचा हे महाराष्ट्र भाजपकडे सोपवले असून स्वत: ठराविक अंतरावर राहायचे ठरवले आहे. भाजप श्रेष्ठींना जागा वाटपाच्या कामात गुंतायचे नाही म्हणून त्यांनी हा उपाय केला असून करार करण्याची जबाबदारी मुख्यमंत्री फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्या अनुभवावर सोपवली आहे. भाजप-सेनेबरोबर देवाण-घेवाण करण्यास उत्सुक आहे. परंतु, जागा वाटप ५० : ५० असे नसेल. ते असेल ते गुणवत्ता आणि जिंकण्याची क्षमता या आधारावर, असे सूत्रांनी सांगितले व आता हे काम राज्य भाजपला करायचे आहे, असे त्यांनी म्हटले.
कठोर भूमिकेचे भाजपकडून संकेत
पक्षश्रेष्ठींचा पवित्रा मित्रपक्षांच्या दबाबाला बळी न पडता ठाम भूमिका घेतली जाईल, असे संकेत देणारा आहे. मुख्यमंत्रीपदाबाबत युतीतील मित्रपक्ष मागण्या करणार असेल तर स्वबळावर निवडणूक लढवण्यास भाजप तयार आहे. २०१४ मध्ये भाजप-शिवसेना जागावाटपावर एकमत न झाल्याने स्वतंत्रपणे निवडणूक लढले होते.