भविष्यातील भाषेत शब्द नव्हे प्रतिमा राहणार
By admin | Published: April 3, 2017 10:00 PM2017-04-03T22:00:59+5:302017-04-03T22:00:59+5:30
इतिहासकाळापासून सातत्याने विविध भाषांचे आकलन करून मानवी मेंदू थकला आहे. मात्र प्रतिमांच्या माध्यमातून समजून घेण्याची मानवी मेंदूची क्षमता वाढली
Next
>ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 3 - इतिहासकाळापासून सातत्याने विविध भाषांचे आकलन करून मानवी मेंदू थकला आहे. मात्र प्रतिमांच्या माध्यमातून समजून घेण्याची मानवी मेंदूची क्षमता वाढली आहे. भविष्यातील भाषा शब्दांपेक्षा प्रतिमांची राहील. अगदी दुसºया ग्रहांवरदेखील ती भाषा समजू शकेल, असे मत ज्येष्ठ भाषातज्ज्ञ डॉ.गणेश देवी यांनी व्यक्त केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ येथे डॉ. वि. भि. उपाख्य भाउसाहेब कोलते मराठी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
तंत्रज्ञानाचा वापर वाढीस लागला आहे. मानवी मेंदूतदेखील अनेक परिवर्तन होत आहेत. त्यामुळे भाषांमध्येदेखील प्रचंड बदल होईल व पुढील ३० वर्षांत ९० टक्के भाषा संपुष्टात येतील. भविष्यातील भाषा ही ‘डिजिटल’ गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात येईल, असे प्रतिपादन डॉ.देवी यांनी केले.
एका भाषेतून दुसºया भाषेत प्रवेश करणे ही भारताची संस्कृती आहे. त्यामुळे भारत हा बहुभाषिक देश आहे. भाषा ही संस्कृतीचे आदान-प्रदान करणारे माध्यम आहे. मात्र, आजही अनेक देशांना भाषेचे हवे तसे महत्त्व पटलेले नाही. त्यामुळे अनेक देशांतील भाषा नष्ट होतील, असेदेखील ते म्हणाले.
मराठी जिवंत राहणारच
मराठी भाषेचे महत्त्व कमी होत आहे, अशी ओरड होते. मात्र मराठी भाषेत आजही विविध शब्दांची भर पडत आहे. ही भाषा जगातील पहिल्या १८ भाषांमध्ये येते तर बहुभाषिक देशांमध्ये ती पहिल्या चारमध्ये आहे. त्यामुळे इतर भाषा इतिहासजमा झाल्या तरी मराठी मात्र जिवंत राहणारच, असा दावा डॉ.देवी यांनी यावेळी केला. भाषांबाबतचा दुराभिमान बाजूला ठेवून एकमेकांना जोडण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहेत. नवी सांस्कृतिक चळवळच देशात निर्माण व्हायला हवी, असे ते म्हणाले.