बार्शीकर पाठिशी असल्याने काळजी नाही : राजेंद्र राऊत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2019 05:34 PM2019-10-16T17:34:04+5:302019-10-16T18:33:52+5:30
बार्शीत शिवसेना उमेदवार दिलीप सोपल, अपक्ष राजेंद्र राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे निरंजन भूमिकर यांच्यात तिरंगी लढत रंगण्याची शक्यता आहे.
- राजा माने
मुंबई - विधानसभा डोळ्यासमोर ठेवून अनेक नेत्यांनी पक्षांतर केले. त्यात बार्शी मतदारसंघातील नेतेही आघाडीवर होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप सोपल यांनी शिवसेनेत प्रवेश करून विधानसभेची उमेदवारी मिळवली. तर भाजपचे राजेंद्र राऊत यांनी भाजपचा राजीनामा देत अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली. बार्शीची जनता आपल्या पाठिशी असल्यामुळे काळजी नसल्याचे राऊत यांनी सांगितले.
'मी लोकमत' या कार्यक्रमात राऊत यांनी बार्शी मतदार संघातील परिस्थितीविषयी सांगितले. बार्शी मतदारसंघातील निवडणूक येथील जनतेने आपल्या ताब्यात घेतली आहे. त्यामुळे चांगल्या पद्धतीचे वातावरण झाले आहे. मी आतापर्यंत सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये केलेले काम आणि विकासाचा दृष्टीकोन यामुळे ही निवडणूक जनतेने आपल्या ताब्यात घेतली आहे. बार्शी तालुक्यात विकासाचं नवे पर्व सुरू करण्यासाठी आपल्याला पाठिंबा मिळत असल्याचे राऊत म्हणाले.
मुख्यमंत्र्यांपासून अनेक दिग्गज नेते सोबत असताना भाजपचा राजीनामा देऊन मैदानात उतरल्यानंतर काळजी वाटत नाही का, यावर राऊत म्हणाले, बार्शी तालुक्यातील संपूर्ण जनता माझ्या पाठिशी आहे. त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही. बार्शीत शिवसेना उमेदवार दिलीप सोपल, अपक्ष राजेंद्र राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे निरंजन भूमिकर यांच्यात तिरंगी लढत रंगण्याची शक्यता आहे.