खोटे बोलण्याचे नोबेल आमच्या भावाला मिळेल
By admin | Published: February 10, 2017 01:36 AM2017-02-10T01:36:40+5:302017-02-10T01:36:40+5:30
भावामुळे मी वैतागून गेले आहे़ आमचे बंधू इतके खोटे बोलायला लागले आहेत की, खोटे बोलण्याचे नोबेल त्यांना मिळेल,
उदगीर / जळकोट (जि. लातूर) : ‘भावामुळे मी वैतागून गेले आहे़ आमचे बंधू इतके खोटे बोलायला लागले आहेत की, खोटे बोलण्याचे नोबेल त्यांना मिळेल,’ अशी टीका ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंचा नामोल्लेख टाळून केली़
जळकोट व उदगीर येथील प्रचार सभेत पंकजा मुंडे यांनी धनंजय यांचे नाव न घेता, त्यांनी जोरदार हल्ला चढविला़ त्या म्हणाल्या, माझ्यावर कितीही टीका केली तरी बोलले नाही़ परंतु आता माझ्या लोकांनी मौन बाळगू नका, उत्तर द्या़, अशी शपथ घातलीय़ म्हणून मी बोलतेय़ आमचे बंधू म्हणतात, गोपीनाथ मुंडेंनी त्यांना बाहेर काढले़ आम्हाला जायचे नव्हते़ त्याच्या दोनच दिवसांनी अजित पवार म्हणतात, धनंजयने दीड वर्ष आमच्याकडे चकरा मारल्या़ शेवटी दुसऱ्या पक्षात जातो म्हटल्यावर आम्ही घेतले़ मग आता खोटं कोण बोलतेय, हे त्यांनी जाहीर करावेच, असे आव्हान त्यांनी दिले़
वाढदिवसाचे नवे संशोधन
गोपीनाथ मुंडे यांच्या वाढदिवसावरून चाललेल्या वादावर बोलताना पंकजा मुंडे अजित पवार व धनंजय मुंडे यांच्यावर तोंडसुख घेतले़ त्या म्हणाल्या, आता तर नवीन संशोधनच यांनी सुरू केले आहे़ गोपीनाथ मुंडेंचा वाढदिवस कुठला? ते आता हयात नाहीत़ मयत शत्रूबद्दलही आपण वाईट बोलत नाही़ ते जिवंत नसताना हिणवण्याचे काम करू नका़ (प्रतिनिधी)