"उद्धवजींनी थोबाडीत मारली तरीही कोणी सत्तेतून बाहेर पडणार नाही"
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2021 08:06 PM2021-09-11T20:06:11+5:302021-09-11T20:08:54+5:30
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा गौप्यस्फोट; म्हणे, कॅबिनेट मंत्र्यांचे खासगीत वक्तव्य
कोल्हापूर : दोन्ही कॉंग्रेसनी प्रचंड महत्त्वाची खाती घेवून आपला पारंपरिक कारभार सुरू ठेवला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थोबाडीत जरी मारली तरी कोणीही सत्तेतून बाहेर पडणार नाही असे मित्र असलेला कॅबिनेट मंत्री माझ्याजवळ बोलला आहे असा गौप्यस्फोट भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी आज केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या कोणत्याही धमक्यांना आम्ही घाबरत नाही असेही त्यांनी सांगितले.
कोल्हापुरात पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी महाविकास आघाडीला टीकेचे लक्ष्य केले. आमदार पाटील म्हणाले, १२ बलुतेदार आणि नव्या १८ क्षेत्रातील असंघटित कामगारांना दरमहा पाच हजार रूपये द्या अशी भाजपची मागणी आहे. यासाठी ५० हजार कोटी लागणार आहेत. आम्ही पुण्यात रिक्षाचालक, शालेय बसेसचे चालक यांना दरमहा काही निधी देतो. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजप कार्यकर्त्यांना खोट्या केसेस टाकून हैराण केले जात आहे. जरा मनाविरूद्ध वागले की आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या होताहेत. कोविड आचारसंहितेचा सोयीनुसार वापर सुरू आहे.
शिवसेनेची मोठी घोषणा; उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत सर्वच्या सर्व जागा लढणार, भाजपवरही गंभीर आरोप
भुजबळांची इमारत जप्त झाली त्याचे काय?
खालच्या कोर्टात दोषारोप सिध्द झाले नाहीत म्हणून भुजबळ आणि राष्ट्रवादी ढोल बडवत आहे. याचवेळी त्यांची मुंबईतील १०० कोटींची बेनामी इमारत जप्त झाली त्याचे काय असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला.
कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा
मुंबई आणि पुण्यातील बलात्काराच्या घटना पाहता राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. कायद्याचा धाक राहिलेला नाही. बलात्कार करणाऱ्यांना लवकर अटक होत नाही, झाली तर दोन दिवसात जामीन होतो. त्यामुळे धाडस वाढले आहे. मुख्यमंत्र्यांनी याचे मॉनिटेरिंग केले पाहिजे असे पाटील यांनी सांगितले.
मुश्रीफ यांची वृत्ती
कोल्हापूरच्या शेजारील गावांची मानसिकता पाहून आम्ही प्राधिकरण तयार केले. नंतर आमचे सरकार गेले. परंतू तुमचे सरकार येवून २२ महिने झाले. तुम्ही प्राधिकरणाला किती निधी दिला असा उलट सवाल पाटील यांनी उपस्थित केला. आंबेओहोळसाठी फडणवीस यांच्याशी भांडून निधी लावून घेतला. परंतू मुश्रीफ यांची वृत्तीच खोटं बोल पण रेटून बोल अशी आहे त्याला काय करणार, असा टोला पाटील यांनी लगावला..