नोटाबंदीचा गोव्याच्या पर्यटनाला फटका नाही - पंतप्रधान मोदी
By admin | Published: January 28, 2017 06:22 PM2017-01-28T18:22:34+5:302017-01-28T21:51:47+5:30
नोटाबंदीचा गोव्याच्या पर्यटनावर कोणताही परिणाम झाला नसल्याचे सांगत पंतप्रधान मोदींनी आपल्या निर्णयाचे समर्थन केले.
Next
ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. २८ - गोव्यातील विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पणजीत सभा घेत प्रचाराला प्रारंभ केला. दोन महिन्यांपूर्वी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयावरून मोदींवर टीका होत असतानाच त्यांनी हाच मुद्दा उचलून धरत नोटाबंदीचा गोव्याच्या पर्यटनावर कोणताही परिणाम झाला नसल्याचे सांगत आपल्या निर्णयाचे समर्थन केले. 'गोव्यात भाजपाला स्पष्ट बहुमत दिल्यास गोवा देशातील सर्वोत्तम राज्य होईल' असे सांगत गोव्याला स्थिर सरकार द्या असे मोदी म्हणाले. गोवा विधानसभेसाठी येत्या चार फेब्रुवारीला मतदान होणार आहे. या निवडणुकीत भाजपच्या प्रचारार्थ आयोजिलेल्या जाहीर सभेत पंतप्रधान मोदी बोलत होते
गोव्याने देशाला पर्रिकरांच्या रुपात संरक्षणमंत्री दिला आहे, सर्जिकल स्ट्राइकची चर्चा संपूर्ण देशात आहे असे सांगत मोदींनी मनोहर पर्रीकरांची स्तुती केली. तसेच विरोधकांवर टीकास्त्र सोडतानाच 'ज्यांचा निवडणूक आयोगावर विश्वास नाही, ते निवडणुकीच्या रणांगणात का उतरले?' असा सवालही त्यांनी विचारला.
केंद्रातील सरकार धाडसी असून ते धाडसी निर्णय घेत आहे. यापुढेही देशहितासाठी आम्ही धाडसी निर्णय घेत राहू. नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशातील भ्रष्टाचारीच घाबरले; कारण सत्तर वर्षे त्यांनी जे काही लुटले ते केंद्र सरकार परत घेत आहे, असेही ते म्हणाले. कर्नाटकमध्ये एका काँग्रेस मंत्र्याच्या घरी छापा पडला तेव्हा दीडशे कोटी रुपये रोख, नव्या नोटांच्या रूपात सापडले. तरी देखील त्या मंत्र्याविरुद्ध कर्नाटक सरकारने कोणतीही कारवाई केली नाही. साधी नोटीसही त्याला पाठवली नाही. गोव्यात अशा प्रकारचे भ्रष्टाचारी जर लोकांना नको असतील तर लोकांनी भाजपला येत्या विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत द्यावे. आपण येत्या पाच वर्षांत गोवा पूर्ण बदलून दाखवतो, अशी ग्वाही मोदी यांनी दिली. ते म्हणाले, नोटाबंदीचा लाभ देशातील गरिबांना होईल. सामान्य लोकांना होईल. आता यापुढे केंद्र सरकारचा अर्थसंकल्प जाहीर होणार आहे. तथापि, अर्थसंकल्प जाहीर होण्याअगोदरच काही विरोधक व काही कथित अर्थतज्ज्ञ अर्थसंकल्प कसा अपयशी आहे, बेकार आहे ते दाखवून देण्यासाठी प्रतिक्रिया व भाषणांचा मसुदा तयार करू लागलेत. त्यांची पूर्वतयारी अगोदरच सुरू झाली आहे. अर्थसंकल्पाच्या नावाने विरोधात बोलले की मग गोवा, पंजाब, उत्तर प्रदेश, मणिपूर आदी राज्यांमध्ये केंद्रातील भाजप सरकारविरुद्ध चुकीचा संदेश जाईल, असे विरोधकांना वाटते.
गोव्याला राजकीय अस्थिरतेचा शाप आहे. अस्थिरतेमुळे यापूर्वीच्या काळात गोवा राज्य मागे राहिले. मात्र, आता गोव्याचा विकास एवढ्या चांगल्या प्रकारे होत आहे, की देशातील मोठ्या राज्यांना देखील त्यातून धडा शिकायला मिळत आहे, असे मोदी म्हणाले. या वेळी पर्रीकर व पार्सेकर यांचीही भाषणे झाली.