स्वरोत्सवात रसिकांना अनुभूती नादब्रह्माची
By admin | Published: December 12, 2015 12:32 AM2015-12-12T00:32:59+5:302015-12-12T00:32:59+5:30
गर्दीने तुडुंब भरलेले प्रेक्षागृह टाचणी पडली तरीही आवाज होईल अशी शांतता... बघणाऱ्यालाही भुरळ पाडेल अशी श्रोत्यांची तल्लीनता...
पुणे : गर्दीने तुडुंब भरलेले प्रेक्षागृह टाचणी पडली तरीही आवाज होईल अशी शांतता... बघणाऱ्यालाही भुरळ पाडेल अशी श्रोत्यांची तल्लीनता... चेहऱ्यावरचा आनंद एकाग्रतेने मंत्रमुग्ध झालेला आसमंत अन् ऐन थंडीत चिंब करणारा सूरवर्षाव... अशा भारावलेल्या वातावरणात रसिकांनी नादब्रह्माची अनुभूती घेतली. डोळ्यांची पापणी लवते न लवते अशा वाऱ्याच्या वेगाने परंतु तेवढ्याच कोमलपणे सतारीवर फिरणारी नीलाद्रिकुमार यांची बोटे आणि धीरगंभीर घुमटाकार आवाजाने रसिकांना सुरांच्या विश्वातील एका वेगळ्याच उंचीची सैर घडविणारे संगीतमार्तंड पंडित जसराज यांच्या स्वर्गीय स्वरांनी रसिकांची ब्रह्मानंदी टाळी लागली.
६३ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवातील दुसरा दिवस रसिकांच्या दृष्टीने संस्मरणीय ठरला. संगीतमार्तंड पंडित जसराज, शुचिस्मिता दास, अमजद अली, नीलाद्रिकुमार यांनी मैफलीत अनोखे रंग भरले. सुरावटीबरोबरच सतार आणि तबल्याची रंगलेली जुगलबंदी रसिकांच्या काळजाचा ठाव घेऊन गेली.
नीलाद्रिकुमार यांच्या रुपाने संगीत क्षेत्रात आलेली पाचवी पिढी. वडील कीर्तीकुमार यांच्याकडून संगीताचे धडे घेतलेल्या नीलाद्रिकुमार यांनी वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी स्वरमंचावर येऊन आपल्यातील प्रतिभेचे दर्शन घडविले. सतारीवर प्रभुत्व मिळविलेल्या नीलाद्रिकुमार यांनी झिटार हे स्वत:च्या संकल्पनेतून साकारलेले वाद्य लोकप्रिय ठरले आहे. तब्बल ४५ मिनिटे वादन करून प्रतिभेचे दर्शन घडविले.
राग शुद्ध कल्याणने त्यांनी आपल्या वादनास सुरुवात केली. त्यानंतर आलाप, जोड सादर केले. त्यानंतर सुरू झाला तो सतार आणि तबल्याचा सांगितिक संवाद. पंडित नीलाद्रिकुमार आणि पंडित विजय घाटे स्वत:ही वादनात रंगून जात रसिकांना परिपूर्णतेची अनुभूती दिली. दोघा कलाकारांनी एकमेकांच्या सादरीकरणाला दाद देत मैफल रंगविली. सादरीकरणाला मिळणारी दाद पाहून कलाकारांनाही आनंदाचे लेणे लाभले.
या वादनाच्या मैफलीपाठोपाठ पंडित जसराज यांनी स्वरमंचावर पाऊल ठेवले. रसिकांनी त्यांना टाळ्यांच्या गजरात दाद दिली. पंडित जसराज यांच्यापाठोपाठ रसिकांनीही ‘जय हो’चा गजर केला. ‘मंगल भगवान विष्णू’ या रचनेने त्यांनी मैफलीला सुरुवात केली.
‘करत ना मोसे बतिया’ ही रचना सादर करून ‘ओम नमो भगवते वासुदेवाय’ या भजनाने रसिक भक्तिरसात चिंब झाले. या रचनेपाठोपाठ विठ्ठलाचा गजर केला. पंडित रामकुमार मिश्रा (तबला), मुकुंद पेटकर (हार्मोनियम), श्रीधर पार्थसारथी (मृदंगम) तसेच रत्नमोहन शर्मा, अंकिता जोशी व इतर शिष्यवर्गाने साथसंगत केली.
पतियाला घराण्याच्या गायिका शुचिस्मिता दास यांनी बडे गुलाम अली खाँ यांच्या स्मृतींना उजाळा
देत सादरीकरणास सुरुवात
केली. शुद्ध सारंग रागात त्यांनी
पहिली बंदिश पेश केली.
‘सलोनी’ ही बंदिश हावभावासह
गात त्यांनी सप्तसुरांची उधळण
केली. विलंबित एकतालातील बंदिशीनंतर बडे गुलाम अली खाँ यांची ‘तुम बिन मै का रे’
ही दृतएकतालातील बंदिश अनुभवाताना सर्वांचेच मन
हेलावले. दृत तीनतालातील
‘बोलन लागे’, ‘गरज बिन लागे...पपीहा’ या बंदिशींनी ‘सवाई’ची सायंकाळ रम्य झाली.
‘याद पिया की आये, ये दुख सहा ना जाये’ हा दादरा गात शुचिस्मिता यांनी अमृतरसाची अनुभूती
दिली. स्वर्गीय संगीताचा अनुभव
घेता आल्याच्या भावना सर्व रसिकांच्या चेहऱ्यावर झळकत
होत्या. शुचिस्मिता दास यांना मिलिंद कुलकर्णी (हार्मोनियम), संदीप घोष (तबला), दिलशाद खाँ (सारंगी), वैष्णवी अवधाली आणि राजश्री महाजनी (तानपुरा) यांनी सुरेल
संगत केली. संदीप घोष
यांच्या तबलावादनाने मैफलीची
रंगत वाढवली.
किराणा घराण्याचे अमजद अली यांनी सुरांचा प्रवास पुढे नेत आनंदाचा झरा प्रवाही ठेवला. वडील
आणि पहिले गुरु उस्ताद
अख्तर नवाज खाँ यांच्या
सुरांचा वारसा त्यांनी जपला
आहे. दादरा, ठुमरी, भजन,
ख्याल गायकीमध्ये सहसुंदर वावर असलेल्या या गायकाने काही क्षणांमध्येच रसिकांवर संगीताची मोहिनी घातली. पुरिया धनाश्री रागात त्यांनी बंदिशींचा सुरेल विस्तार केला. ‘याद तेरी दिलसे, भुला सकूँ कैसे’ या सादरीकरणाने त्यांनी स्वरमहालावर जादूची कांडी फिरवली. अमजद अली यांना अविनाश दिघे (हार्मोनियम), प्रशांत पांडव (तबला), मुकुंद बाद्रायणी आणि नामदेव शिंदे (तानपुरा) यांनी साथसंगत केली. (प्रतिनिधी)
सवाईत गाण्याचे माझे लहानपणापासूनचे स्वप्न होते. ते आज सत्यात उतरले आहे. संगीतावरील प्रेमाची साक्ष रसिकांनी उपस्थितीतून दिली आहे. चोखंदळ प्रेक्षकांची हजेरी हीच माझ्यासाठी पोचपावती आहे. युवावर्गाची लक्षणीय संख्या पाहून त्यांचा संगीताकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आशादायी आहे. ‘सवाई’त गाताना खूप मजा आली. उत्तम दाद दिल्याबद्दल रसिकांचे मन:पूर्वक आभार मानते.
- शुचिस्मिता दास
संगीत साधनेच्या मोलाची मोजदाद कोणत्याच रुपात करता येणार नाही. संगीताची पूजा करणे आणि तो वारसा पुढील पिढीला हस्तांतरित करण्याची इच्छा आहे. शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसारच हा वारसा जतन करू शकेल. ‘सवाई’तील पहिलेवहिले सादरीकरण हा सर्वोच्च सन्मान आहे. या स्वरमंचावर पुन्हा गाण्याची संधी मिळावी, हीच ईश्वराकडे प्रार्थना करेन.
- अमजद अली