नेमाडेंनी काढला बाबासाहेब पुरंदरेंना चिमटा!
By admin | Published: May 24, 2015 01:42 AM2015-05-24T01:42:41+5:302015-05-24T01:42:41+5:30
काही मंडळी चुकीचा इतिहास सांगून दिशाभूल करीत असतात. काही इतिहासकारांकडून खरा इतिहास लपविला गेल्याने छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ हिंदुंचे राजे भासविले गेले,
यावल (जि. जळगाव) : काही मंडळी चुकीचा इतिहास सांगून दिशाभूल करीत असतात. काही इतिहासकारांकडून खरा इतिहास लपविला गेल्याने छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ हिंदुंचे राजे भासविले गेले, असे सांगत वाचनाने खरा इतिहास कळतो अन्यथा बाबासाहेब पुरंदरे सांगतील तोच खरा इतिहास, अशा शब्दांत ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी पुरंदरे यांना चिमटा काढला.
ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्यानंतर नेमाडे प्रथमच त्यांच्या सांगवी बुद्रुक (ता. यावल) या मूळ गावी आले आहेत. ते दरवर्षी गावी येतात. शनिवारी ते आल्याचे कळताच प्रांताधिकारी अरविंद अतुर्लीकर, तहसीलदार विजयकुमार ढगे यांनी त्यांचे स्वागत केले.
साहित्य वाचनाने विचारांची उंची वाढते. भावी पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी राज्य शासनाने गावोगावी वाचनालये सुरू करावीत, असे मत ज्ञानपीठ त्यांनी व्यक्त केले. केरळप्रमाणे महाराष्ट्रातही गावोगावी वाचनालये सुरू व्हावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात अनेक मुस्लीम योद्धे होते. गड, किल्ले जिंकण्यात त्यांचा वाटा होता, असे ते म्हणाले.
नेमाडे सध्या इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ अॅडव्हॉन्स स्टडी या संस्थेसाठी सहा विविध भाषांतील साहित्याचा मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेत अनुवादाचे काम करीत आहेत. नेमाडे २७ मेपर्यंत सांगवीत राहणार आहेत. ते आप्तेष्ठांच्या भेटीगाठी घेतील. शेतावरही जाणार आहेत. (प्रतिनिधी)