‘सुगी’वर नोटबंदी संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2016 06:20 AM2016-11-16T06:20:01+5:302016-11-16T06:20:01+5:30
एक हजार आणि पाचशेच्या जुन्या नोटा बंद झाल्याने, ऐन सुगी हंगामात निर्माण झालेल्या अभूतपूर्व चलनटंचाईमुळे शेतकऱ्यांवर सुलतानी संकट
योगेश बिडवई / मुंबई
एक हजार आणि पाचशेच्या जुन्या नोटा बंद झाल्याने, ऐन सुगी हंगामात निर्माण झालेल्या अभूतपूर्व चलनटंचाईमुळे शेतकऱ्यांवर सुलतानी संकट कोसळले आहे. शेतमालाच्या खरेदी विक्रीचे व्यवहार ठप्प झाल्याने, ग्रामीण भागात अक्षरश: आर्थिक आणीबाणी उद्भवली आहे.
खरिपाचे पीक बाजारात विक्रीसाठी आलेले असताना व रब्बी हंगामाची लगबग सुरू असताना, हजार आणि पाचशेच्या जुन्या नोटा चलनातून बाद झाल्याने, शेतकरी, शेतमजुरांची आर्थिक कोंडी झाली आहे. व्यापाऱ्यांनी कृषिमालाची खरेदी बंद केल्याने ग्रामीण चलनवलनच थांबले आहे.
दमदार पावसामुळे राज्यात खरिपाचे जोमदार पीक आले आहे. शेतमाल विकून चार पैसे मिळण्याच्या आशेवर असलेले शेतकरी बहुतांश बाजार समित्या बंद असल्याने निराश आहेत. रब्बी हंगामासाठी बियाणे, खते, मजुरीचे पैसे देण्यासाठी त्यांच्याकडे रोकड शिल्लक नसल्याने स्थिती आणखी बिकट झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव व लासलगाव बाजार समित्या वगळता, इतर ठिकाणी कांदाखरेदी सुरू होती. मात्र, किरकोळ व्यापाऱ्यांच्या हातात पुरेशी रोकड नसल्याने कांद्याला मोठी मागणी नाही. त्यामुळे व्यापारी कांद्याची खरेदी करत नसल्याचे चित्र आहे. सरकारी कार्यालयांप्रमाणे कृषिमाल विकल्यानंतर पाचशे व हजार रुपयांच्या नोटा स्वीकारण्याची शेतकऱ्यांना परवानगी द्यावी, म्हणजे घाऊक व्यवहार सुरळीत होतील, असे मत पिंपळगाव बाजार समितीचे अध्यक्ष दिलीप बनकर यांनी व्यक्त केले.
विदर्भ व मराठवाड्यात मका, कापूस, सोयाबीनची विक्री करताना शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. काहींना उधारीवर तर काहींना चेकने माल विकावा लागत आहे. ही एकप्रकारची आर्थिक आणिबाणीच असल्याचे कृषी अर्थतज्ज्ञ रमेश पाध्ये यांचे म्हणणे आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीने नोव्हेंबर हा महत्त्वाचा महिना असतो. खरिपाचे पीक बाजारात विकून रब्बीची तयारी सुरू होते. त्यासाठी चार पैसे त्याच्या हातात असणे गरजेचे असते. मात्र सरकारने पुरेशी काळजी न घेता शेतकऱ्यांचा कोणताही विचार न करता सुगीच्या दिवसांतच नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शेतकऱ्यांवर सुलतानी संकट कोसळले आहे. देशात एका आठवड्यात कांद्याच्या मागणीत तब्बल ५० टक्के घट झाली आहे. त्यामुळे आम्ही जपून खरेदी करत आहोत, असे कांदा व्यापारी संघटनेचे अध्यक्षसोहनलाल भंडारी म्हणाले.