नोटाबंदीने अर्थव्यवस्थेचे तीनतेरा वाजविले - सुनिल तटकरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2017 03:53 AM2017-11-09T03:53:52+5:302017-11-09T03:54:20+5:30
नोटाबंदीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. नोटाबंदीच्या निर्णयामुळे समाजातील सर्व घटकांना मोठा फटका बसला आहे.
मुंबई : नोटाबंदीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. नोटाबंदीच्या निर्णयामुळे समाजातील सर्व घटकांना मोठा फटका बसला आहे. सर्वसामान्य जनतेचा वर्षानुवर्षांचा रोजगार हिरावला गेला. त्यामुळे आता जनताच या सरकारला पायउतार करेल, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी बुधवारी केली.
नोटाबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त आझाद मैदान येथे राष्ट्रवादी काँग्रेसने निदर्शने केली. सुनिल तटकरे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात नोटाबंदीचे विधीवत श्राद्धही घालण्यात आले. यावेळी तटकरे म्हणाले की, ‘नोटाबंदीमुळे आर्थिक चालना मिळेल असे वाटले होते. प्रत्यक्षात देश आर्थिक मंदीकडे वळला. आर्थिक व्यवस्था कोलमडल्याने महागाई वाढली. शेतकरी, शेतमजुर उध्वस्त झाला.’ देशाच्या अर्थव्यवस्थेचे तीनतेरा वाजवण्याचे काम नोटाबंदीच्या निर्णयाने केल्याचा आरोप तटकरे यांनी केला. यावेळी नोटाबंदीच्या काळात रांगेत उभे राहून मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रध्दांजली वाहण्यात आली. तर, नोटाबंदीचा निर्णय म्हणजे या देशातील सगळयात मोठा घोटाळा असल्याची टीका धनंजय मुंडे यांनी केली.
राष्ट्रवादीकडून नोटाबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त राज्यभर काळा दिवस पाळण्यात आला. आझाद मैदान परिसरातील आंदोलना दरम्यान विधीवत वर्षश्राध्द घालण्यात आले. यावेळी ‘नोटाबंदीचं करायचं काय, मोदीला मत द्यायचं नाय...ये तो सिर्फ झांकी है, अभी इलेक्शन बाकी है...मोदी सरकार हाय-हाय...’ अशा घोषणाही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दिल्या.
नाशकात घातले श्राद्ध
काँग्रेससह इतर विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गोदातीरी नोटाबंदीचे विधिवत श्राद्ध घातले. महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांनी चक्क मुंडण केले. या वेळी सरकारची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. पुणे, नागपूर, औरंगाबादसह सर्वच जिल्ह्यांत नोटाबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेस, ‘आप’सह विविध संस्था, संघटनांनी केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केला. शिवसेनेच्या वतीने नोटाबंदीच्या विरोधात प्रतीकात्मक श्राद्धविधी कार्यक्रम करण्यात आला. गोदाकाठावर विधिवत मंत्रोच्चारात केंद्र सरकारच्या नोटाबंदीचे श्राद्ध घालण्यात आले.