... हे तर नेमचेंजर सरकार!
By admin | Published: June 9, 2016 05:45 AM2016-06-09T05:45:50+5:302016-06-09T05:45:50+5:30
फुले यांचे नाव देण्याचा सरकारचा निर्णय हा अकारण वाद निर्माण करणारा असून हे तर खालच्या पातळीवरील राजकारण आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी आज केली.
मुंबई : राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचे नाव बदलून त्यास महात्मा फुले यांचे नाव देण्याचा सरकारचा निर्णय हा अकारण वाद निर्माण करणारा असून हे तर खालच्या पातळीवरील राजकारण आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी आज केली. सरकार ‘गेमचेंजर’ नसून ‘नेमचेंजर’ असल्याची कोपरखळीही त्यांनी मारली.
शासकीय योजनांना महात्मा फुले यांचे नाव दिलेच पाहिजे. त्यांच्या नावाला कोणीही आक्षेप घेण्याचा प्रश्न नाही, परंतु अगोदरपासून इतर एखाद्या नेत्याच्या नावाने सुरू असलेल्या योजनेला दुसऱ्या महापुरूषाचे नाव देणे अयोग्य आहे. भाजप सरकारला राजीव गांधी जीवनदायी योजनेचे नाव बदलायचे होतेच. त्यांनी महात्मा फुले यांचे नाव आणून विनाकारण संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. महात्मा फुलेंचे नाव देता येईल, अशी एखादी चांगली योजना सुरू करायला सरकारला काय अडचण आहे? या आधी इंदिरा आवास योजनेचे नाव बदलण्यात आले. जीवनदायी योजनेला राजीव गांधी यांचेच नाव कायम ठेवावे यासाठी आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)
>कामत यांच्याशी संपर्क नाही
>काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरूदास कामत यांच्या राजीनाम्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना खा. चव्हाण म्हणाले की, आम्ही सातत्याने त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत आहोत. परंतु, त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही.
मिळालेल्या माहितीनुसार गुरूदास कामत दिल्लीला गेले असून, त्यांची श्रेष्ठींशी चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतरच यासंदर्भात अधिक प्रतिक्रि या देता येईल.
>वसंतदादांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे करणार
माजी मुख्यमंत्री व थोर नेते वसंतदादा पाटील यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे. हे वर्ष संपूर्ण राज्यात साजरे करण्याचा निर्णय महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने घेतल्याची माहिती चव्हाण यांनी दिली. या वर्षामध्ये मुंबई व सांगली येथे दोन मोठे कार्यक्र म तर राज्यातील सर्व जिल्ह्यात वर्षभर विविध कार्यक्र म होतील. प्रदेश काँग्रेसने त्यासाठी आयोजन समिती स्थापन केली असून स्वत: चव्हाण अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील कार्याध्यक्ष तर यशवंत हाप्पे हे समन्वयक आहेत.