नोटाबंदीचा फटका : ‘गुलशनाबाद’च्या गुलाबाची परदेशवारी हुकली
By Admin | Published: February 13, 2017 09:56 PM2017-02-13T21:56:46+5:302017-02-13T22:11:49+5:30
‘व्हॅलेंटाइन डे’च्या औचित्यावर भारतीय बाजारपेठेचा आधार
अझहर शेख / नाशिक : गुलशनाबाद ही नाशिकची जुनी ओळख. येथील ‘रेड रोझ’ बघताच तरुणाईच्या मुखातून ‘वॉव’ असा शब्द बाहेर पडल्यास आश्चर्य वाटू नये. ‘व्हॅलेंटाइन डे’च्या औचित्यावर नाशिकमधील गुलाब उत्पादकांनी घेतलेल्या उत्पादनाला यंदा नोटाबंदीचा फटका बसला आहे. परदेशात गुलाबाची निर्यात करणाऱ्या कंपन्या शेतकऱ्यांच्या बांधावर अपवादानेच पोहचल्याने गुलशनाबादच्या गुलाबाची परदेशवारी हुकली.
शहरातील जानोरी, मोहाडी, गंगापूर, गोवर्धन, गिरणारे, मखमलाबाद या भागांमध्ये गुलाबाची शेती मोठ्या प्रमाणात आहे. जानारी हे निर्यातक्षम गुलाबाचे उत्पादन घेणारे माहेरघर म्हणून ओळखले जाते. यावेळी गुलाबाचे उत्पादन शेतकऱ्यांनी घेतले; मात्र मालाला हमीभाव व योग्य बाजारपेठ उपलब्ध होऊ शकली नाही. नोटाबंदीच्या काळात शेतकऱ्यांना गुलाब फुलविण्यासाठी लागणारी विविध रासायनिक औषधे वेळेवर खरेदी करता आली नाही. तरीदेखील आंम्ही उच्च दर्जाचा निर्यातक्षम गुलाब क ष्टाने फुलविला; मात्र गुलाबाला परदेशी बाजारपेठ उपलब्ध होऊ शकली नसल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली. बोर्डेक्स, टॉप सिक्रेट प्रजातीच्या ‘रेड रोझ’चे दोन एकरावर उत्पादन यावर्षी मोठ्या कष्टाने घेतले. नोटाबंदीमुळे निर्यात करणाऱ्या कंपन्यांसोबत रोखीचा व्यवहार होऊ शकला नाही. यामुळे नवी दिल्ली, मुंबईच्या बाजारपेठेचा आधार नाशिकच्या शेतकऱ्यांना लाभला आहे.