नवी मुंबईचे मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली
By admin | Published: March 25, 2017 02:13 AM2017-03-25T02:13:26+5:302017-03-25T02:13:26+5:30
लोकप्रतिनिधींबरोबर बंद झालेला संवाद, अनेक धाडसी व वादग्रस्त निर्णय यामुळे चर्चेत राहिलेले नवी मुंबईचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे
नवी मुंबई : लोकप्रतिनिधींबरोबर बंद झालेला संवाद, अनेक धाडसी व वादग्रस्त निर्णय यामुळे चर्चेत राहिलेले नवी मुंबईचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची अखेर राज्य शासनाने बदली केली आहे. विशेष म्हणजे, बेकायदा बांधकामे नियमित करण्यासंदर्भातील मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर मुंढे यांच्या झालेल्या बदलीबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. नवी मुंबई मनपा आयुक्तपदावर आता रामास्वामी एन. यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
शासनाने २ मे २०१६ रोजी पालिका आयुक्तपदावर मुंढे यांची नियुक्ती केली होती. पहिल्याच दिवशी मालमत्ता कर विभागातील कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेऊन त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. निष्काळजीचा ठपका ठेवून अधिकारी व कर्मचाऱ्यांवर केलेली कारवाई, अतिक्रमण विरोधी मोहीम यामुळे ते सतत चर्चेत होते. पण नंतर लोकप्रतिनिधींशी विसंवाद वाढला आणि अखेर २५ आॅक्टोबरला त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव मांडण्यात आला. १११पैकी १०५ सदस्यांनी या ठरावास पाठिंबा दिला होता. भाजपाच्या ६ नगरसेवकांनी त्यांच्या बाजूने मतदान केले होते. पण मुख्यमंत्र्यांची मर्जी असल्याने त्यावेळी त्यांची बदली झाली नाही.
२०१५पर्यंतची घरे नियमित करण्याच्या धोरणासंदर्भात शासनाने उच्च न्यायालयात शपथपत्र दाखल केले होते. तर, या धोरणाला विरोध दर्शविणारे शपथपत्र नवी मुंबई महापालिकेच्यावतीने मुंढे यांनी सादर केले. न्यायालयाने याचे स्वागत केले. तसेच या धोरणाला मंजुरी देण्यास न्यायालयाने नकार दिला आणि याच दिवशी त्यांची आयुक्तपदावरून बदली करण्यात आली, हे विशेष. याविषयी प्रतिक्रिया घेण्यासाठी मुंढे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. (प्रतिनिधी)