नामकरणाचा पाळणा...

By Admin | Published: December 15, 2015 11:45 PM2015-12-15T23:45:35+5:302015-12-16T00:17:12+5:30

कारण -राजकारण

Nomination cradle ... | नामकरणाचा पाळणा...

नामकरणाचा पाळणा...

googlenewsNext

सोमवारी कवठ्यातलं राजकीय पर्यावरण अचानक गढुळलं. कवठेमहांकाळच्या (कोणे एके काळच्या) दुष्काळी टापूतलं पाणीच तसं आहे. खडा टाकला की, लगेच गढुळतंय! सुरुवातीला बरीच वर्षं अजितराव घोरपडे सरकारांनी ते ढवळलं, नंतर आर. आर. आबा पाटलांनी गढुळलेलं पाणी निवळावं म्हणून खरंखुरं पाणी आणलं. म्हैसाळ योजनेच्या पाटानं झुळझुळताना सगळ्यांनी ते डोळे भरून बघितलं. आबा गेले आणि पाणी फिरलं! मागं वळून ते उलटं वहायला लागलं. आबांच्या मागंपुढं झुलणारी, त्यांच्या नावावर पार मुंबईपर्यंत गाड्यांचा धुरळा उडवणारी, मानाची पदं भगणारी, वट वाढल्यानं केसांची झुलपं टेचात फिरवणारी (हवं तर हायूम सावनूरकरांना विचारा!) राष्ट्रवादीची मंडळी संजयकाकांच्या वळचणीला गेली. घड्याळ फेकून देऊन कमळाबाईच्या तलावात डुबक्या मारू लागली. ‘नेतृत्वाची उणीव’ असं कारण देत ‘काकाऽऽ काका’ करू लागली. आबांच्या नंतर खमक्या नेत्याची कमी असली तरी खरं कारण वेगळंच दिसतंय. राष्ट्रवादीची सत्ता गेलीय, त्यामुळं तिकडं ‘खायला’ आणि ‘पोट भरायला’ काहीच उरलेलं नाही... आणि ज्याच्या नावावर मिरवायला मिळत होतं, तोच आता नाही म्हटल्यावर गल्लीतली पोरं तरी विचारतील का?
या मंडळींचे हेतू निवळशार पाण्यागत नक्कीच नाहीत, हे कवठ्याच्या लोकांनी बरोब्बर जोखलंय. आता लोकांसमोर चेहरा उघडा पडलाय म्हटल्यावर या मंडळींना अचानक आबांच्या नावाचा उमाळा आलाय! कवठ्यातल्या पंचायत समितीच्या सभागृहाला आबांचं नाव द्यायच्या मागणीचा ठराव (नव्यानंच मांडलाय जणू!) त्यांनी रेटलाय. पण नऊ महिन्यांपूर्वीच हा ठराव ‘पास’ केल्याचं ते विसरून गेलेत बहुधा. त्यानंतर त्यांनीही डुलक्या काढल्यात आणि ठराव करणारी राष्ट्रवादीही झोपी गेलीय! आता कमळाबाईकडं गेलेल्यांनी आबांच्या नावाचा मुद्दा रेटताच राष्ट्रवादीला जाग आली.. आणि सुरू झाला नामकरणाचा श्रेयवाद! पाणीटंचाईच्या झळांनी अख्खा तालुका होरपळत असताना यांच्यातला श्रेयवाद उफाळून आलाय. तलाव-विहिरीच्या पाण्यानं तळ गाठलाय, ‘म्हैसाळ’चं पाणी दोन महिन्यांपासून बंद झालंय, वीस कोटीवर वीजबील थकलंय, पैसे भरायचं सोडून शेतकरी नव्या ‘पॅकेज’कडं डोळं लावून बसलेत, त्यांच्या सात-बारावर थकित वीजबिलाचे बोजे चढू लागलेत... आणि इकडं नामकरणाचा पाळणा कुणाच्या दोरीनं हलतोय, यासाठी मारामारी सुरू झालीय!!
...तसा नामकरणाचा पाळणा हलवण्याचा, त्यातल्या नेत्यांना झुलवण्याचा आणि लोकांना जोजवण्याचा एककलमी कार्यक्रम जिल्हाभरात सुरू आहेच. दोन-तीन महिन्यांपूर्वी वाळवा पंचायत समितीच्या सभागृहात नामकरणाचा असाच जंगी ‘कार्यक्रम’ झाला. तिथलं जुनं सभागृह मोडीत काढलं गेलं. ते पाडण्यासोबत त्याला दिलेलं वसंतदादांचं नावही पुसण्याचं ठरलं. मग नव्यानं बांधलेल्या सभागृहाला (अर्थातच) राजारामबापूंचं नाव देण्याचा ठराव झाला. आता तिथली सत्ता इस्लामपूरकरांच्या हातात आहे, त्यामुळं राष्ट्रवादीनं हे केलं नसतं तरच नवल! त्यावर काँग्रेसच्या मंडळींनी (पक्षी : जयंत पाटील यांच्या विरोधकांनी) धिंगाणा घातला. पेठनाक्यावर महाडिकांच्या तालमीत तयार झालेल्या सम्राटबाबांनी थेट नव्या सभागृहावर दादांच्या नावाला फलक लावला! (तो काढण्याचं धाडस दाखवणाऱ्याला राष्ट्रवादीनं म्हणे गुपचूप बक्षीस जाहीर केलं! अशी बक्षिसं जाहीर करण्यात विजयभाऊ यांचा हात कोणीच धरु शकत नाही.) काँग्रेसनं पाळणा हलवला खरा, पण सगळ्यांच्या घुगऱ्या खाल्लेल्या जयंतरावांनी जिल्हा परिषदेतही तसाच ठराव ‘पास’ करुन घेतला. आता तिथलं वसंतदादांचं नाव पद्धतशीर पुसलं जाणार, हे नक्की!
नामकरणासोबत नामविस्ताराचे सोहळेही जिल्ह्याला नवीन नाहीत. वसंतदादांनी स्थापन केलेल्या शेतकरी सहकारी साखर कारखान्याला आणि बँकेला त्यांच्या पश्चात त्यांचं नाव देऊन नामविस्तार करण्यात आला. नागनाथअण्णा नायकडवडींनी कष्टानं उभ्या केलेल्या वाळव्याच्या हुतात्मा किसन अहिर साखर कारखान्याला अण्णांच्या नंतर त्यांचंच नाव जोडण्यात आलं. परिणामी ‘पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखाना’ असा लांबलचक नामविस्तार झाला. कुंडलच्या क्रांती कारखान्याला क्रांतिअग्रणी जी. डी. बापूंचं नाव जोडून ‘ क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड क्रांती सहकारी साखर कारखाना’ असा विस्तार करण्यात आला. ‘हुतात्मा’ आणि ‘क्रांती’ ही नावं सहकारातली आदर्श उदाहरणं आणि ‘ब्रँड नेम’ ठरली असताना असे नामविस्तार अनाकलनीयच. नागनाथअण्णा आणि जी. डी. बापूंनी ज्या उद्देशानं ‘हुतात्मा’ आणि ‘क्रांती’ ही नावं दिली, त्या उद्देशांचं काय? खुद्द त्या दोघांना हे रूचलं असतं का? दोघांचा प्रेरणादायी आदर्श स्मरणात रहावा यासाठी सहकाराची नवी मंदिरं उभी करून त्यांना दोघांची नावं देता आली नसती का? अशा प्रश्नांचं मोहोळ पुरोगामी कार्यकर्त्यांना अस्वस्थ करत नसेल का..?
जाता-जाता : परवाच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांचा अमृतमहोत्सव झाला. त्यानिमित्तानं त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्याचे अनेक पैलू नव्यानं उलगडले गेले. पवारांनी बारामतीत उभ्या केलेल्या देखण्या सभागृहाला ग. दि. माडगूळकरांचं, तर नाट्यगृहाला कविवर्य मोरोपंतांचं नाव दिलंय. ते का दिलं, याचं सुस्पष्ट कारणही पवारांनी जाहीरपणे अनेकदा सांगितलंय... मात्र इस्लामपुरातल्या अत्याधुनिक नाट्यगृहाला राजारामबापूंचं नावं ‘कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळं’ (?) देण्यात आलं. नामकरणाचा मोठ्ठा सोहळा झाला. पण त्या परिसरातल्या रेठरे हरणाक्षच्या शाहीर पठ्ठे बापूरावांचं किंवा वाटेगावच्या शाहीर अण्णा भाऊ साठेंचं किंवा नागठाणेच्या बालगंधर्वांचं नाव देणं अधिक उचित ठरलं नसतं का? सांस्कृतिक संचित जपलं गेलं नसतं का? हा सवाल इस्लामपुरातल्या राष्ट्रवादीच्याच मोठ्या (ज्याला सांस्कृतिक क्षेत्रातली जाण आहे!) पदाधिकाऱ्यानं केला. (खासगीत बरं का! चारचौघात बोलून त्याला काय स्वत:चा ‘कार्यक्रम’ करुन घ्यायचाय..?) अनेकांचं बारसं जेवलेल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीतल्या मंडळींनीच आता याचं उत्तर द्यावं...
श्रीनिवास नागे

Web Title: Nomination cradle ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.