नोटाबंदी : बँकेच्या रांगेतील वृद्धांना मदतीचे चिमुकले हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2016 03:35 PM2016-11-18T15:35:40+5:302016-11-18T15:35:40+5:30
गडचिरोलीमधील प्लॅटिनम ज्युबिली हायस्कूल तसेच कनिष्ठ महाविद्यालायचे विद्यार्थ्यांनी बँकांच्या रांगेतील वयोवृद्ध नागरिकांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
गडचिरोली, दि. 18 - देशातील चलनातून 500, 1000 रुपयांच्या जुन्या नोटा 8 नोव्हेंबर रोजी रद्द करण्यात आल्या. त्यानंतर देशभरातील बँक, एटीएमबाहेर पैसे काढण्यासाठी, जुन्या नोटा बदलण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. रांगेमध्ये वयोवृद्ध नागरिकदेखील मोठ्या प्रमाणात उभे राहत आहेत, यातील काही जण अशिक्षित असल्याने बँकांमधील नोटा बदलण्याची प्रक्रियेत त्यांना अडचण येत आहे तसेच शारीरिक त्रासदेखील होत असल्याचे समोर आले.
याच पार्श्वभूमीवर गडचिरोलीमधील प्लॅटिनम ज्युबिली हायस्कूल तसेच कनिष्ठ महाविद्यालायचे विद्यार्थ्यांनी वयोवृद्ध नागरिकांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. गेल्या 10 दिवसांपासून हे विद्यार्थी भारतीय स्टेब बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये जाऊन वृद्ध नागरिकांना पावती भरण्यासाठी, कागदपत्राच्या झेरॉक्सही काढण्यासाठी, फॉर्म भरण्यासाठी मदत करत आहेत. तसेच गर्दीच्या ठिकाणी ग्राहकांना पिण्याचे पाणीदेखील उपलब्ध करुन देत आहेत.
शाळेचे मुख्याध्यापक रहिम अमलानी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी हा उपक्रम सुरू केला आहे. बँकातील गर्दी आटोक्यात येईपर्यंत वृद्ध नागरिक , महिलांसह अन्य लोकांना आमचे विद्यार्थी मदत देतील, अशी माहिती शाळेच्या मुख्याध्यापक यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली. जवळजवळ गेल्या 10 दिवसात 500 हून अधिक ग्राहकांना या विद्यार्थ्यांकडून सेवा मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले.