Vidhan sabha 2019: एकाच इच्छुकाला दोन पक्षांकडून उमेदवारी; वंचितच्या यादीनंतर आपने पत्ताच कापला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2019 05:39 PM2019-09-24T17:39:57+5:302019-09-24T18:06:50+5:30
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर सगळ्याच पक्षांमध्ये इच्छुकांची गर्दी पाहायला मिळत आहे.
कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर सगळ्याच पक्षांमध्ये इच्छुकांची गर्दी पाहायला मिळत आहे. मात्र, कोल्हापूरच्या करवीरमध्ये उमेदवार आपल्याकडे खेचण्यासाठी आप आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये रस्सीखेच लागल्याचे दिसून आले. मात्र, वंचितकडून उमेदवारी जाहीर होताच गुरव नॉट रिचेबल झाल्याने आपने उमेदवारी रद्द केली आहे.
आपने काल आठ जागांवर उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यामध्ये करवीर मतदारसंघातून आनंद गुरव यांच्या नावाची घोषणा केली होती. मात्र, आज वंचित बहुजन आघाडीने जाहीर केलेल्या यादीमध्येही आनंद गुरव यांचे नाव आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. महत्वाचे म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काही दिवसांपूर्वीच इच्छुकांची कमतरता नसल्याचा दावा केला होता. तसेच भाजपामधूनही अनेकांचे उमेदवारीसाठी फोन येत असल्याचे म्हटले होते.
वंचित बहुजन आघाडीने डॉ. आनंद गुरव यांचे नाव यादीमध्ये घेत त्यांच्या नावापुढे पोटजातही लिहिली आहे. तसेच गुरव यांच्याशी वंचितकडून लढण्यासाठी बोलणीही चालू असल्याचे समजते. यामुळे एकच उमेदवार दोन पक्षांच्या यादीमध्ये असल्याने हा उमेदवार काय निर्णय घेतो, य़ाकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.
दरम्यान, गुरव यांनी दोन्ही पक्षांकडे उमेदवारीची मागणी केल्याचे समजते. यामुळे दोन्ही पक्षांनी त्यांना उमेदवारी घोषित केली आहे. वंचितची यादी जाहीर होताच गुरव यांचा मोबाईल नॉट रिचेबल लागत असल्याचे समजते. मात्र, यानंतर आपने गुरव यांची उमेदवारी रद्द केली आहे.
कोण आहेत हे उमेदवार
डॉ. आनंद दादु गुरव (असंडोलीकर) हे आयुर्वेदिक डॉक्टर आणि बालरोग तज्ञ असून वैद्यकीय विषयावर त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ते येथील श्री रासाई हॉस्पिटल चालवतात. त्यांनी शिवाजी विद्यापीठातून पदवी मिळविलेली आहे. पक्ष कोणताही असो, निवडणूक लढवायचीच असा त्यांचा मनसुबा असल्यामुळे त्यांनी उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच प्रचार सुरु केला आहे. यापूर्वी करवीर विधानसभा मतदारसंघात त्यांनी अनेक ठिकाणी आरोग्य शिबीरे घेत प्रचाराचा श्रीगणेशाही केला आहे.
आपची यादी
आज आम आदमी पक्षाने आठ जागांवर उमेदवारी जाहीर केली आहे. ब्रम्हपुरी विधानसभेसाठी पारोमिता गोस्वामी, जोगेश्वरी पूर्वसाठी विठ्ठल लाड, करवीरसाठी आनंद गुरव, नांदगावसाठी विशाल वडघुले, कोथरूडसाठी अभिजित मोरे, चांदिवलीतून सिराज खान, दिंडोशीतून दिलीप तावडे आणि पर्वतीमतदारसंघातून संदीप सोनावणे यांची उमेदवारी जाहीर केली आहे.
वंचितची यादी क्लिक करा