बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीस असहकार
By Admin | Published: February 20, 2016 03:11 AM2016-02-20T03:11:44+5:302016-02-20T03:11:44+5:30
महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघद्वारा संचालित विदर्भ ज्युनिअर कॉलेज टिचर्स असोसिएशनने (विजुक्टा) बारावी बोर्ड परीक्षेच्या
अकोला : महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघद्वारा संचालित विदर्भ ज्युनिअर कॉलेज टिचर्स असोसिएशनने (विजुक्टा) बारावी बोर्ड परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणीस असहकार दर्शवित आंदोलनाचा इशारा दिला आहे. प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी विज्युक्टाने गत शैक्षणिक वर्षातसुद्धा याच पद्धतीने असहकार आंदोलन पुकारले होते आणि त्यामुळे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल नियोजित तारखेपेक्षा आठ दिवस उशिराने जाहीर करावा लागला होता.
राज्यात गुरुवारपासून बारावीच्या परीक्षेला प्रारंभ झाला. २८ मार्चपर्यंत ही परीक्षा चालणार आहे. कनिष्ठ महाविद्यालयांच्या अनेक मागण्या दीर्घ काळापासून प्रलंबित आहेत. माहिती व तंत्रज्ञान विषयाला अद्याप अनुदान देण्यात आलेले नाही. शैक्षणिक वर्ष २००३-०४ ते २०१०-११ या आठ वर्षात पायाभूत पदातील वाढीव पदांवर शिक्षक वेठबिगारीप्रमाणे विनावेतन काम करीत आहेत. मूल्यांकनास पात्र विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांना त्वरित अनुदान द्यावे, २४ वर्षे सेवा पूर्ण झालेल्या शिक्षकांना सरसकट निवड श्रेणी देण्यात यावी, अशा एकूण २0 प्रकारच्या मागण्या आहेत. या मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन देत, १५ आॅगस्ट २0१५पासून त्याची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन शिक्षणमंत्र्यांनी दिले होते; मात्र अद्याप आॅनलाइन संचमान्यतेतील त्रुटी दूर करण्याव्यतिरिक्त इतर कुठल्याच मागण्यांची पूर्तता झाली नसल्याने शिक्षकांमध्ये नाराजीचा सूर आहे. बारावीच्या परीक्षा काळातच यासंदर्भात निर्णय घ्यावा, अन्यथा बारावी बोर्डाच्या उत्तरपत्रिका तपासणीसंदर्भात असहकार आंदोलन पुकारण्याचा इशारा विजुक्टाचे अध्यक्ष प्रा. डॉ. अविनाश बोर्डे व महासचिव प्रा. डॉ. अशोक गव्हाणकर यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)