अशासकीय आयटीआय उद्यापासून बेमुदत बंद
By admin | Published: January 10, 2016 01:45 AM2016-01-10T01:45:16+5:302016-01-10T01:45:16+5:30
अशासकीय आयटीआयला इतर राज्यांच्या धर्तीवर अनुदान मिळावे या मागणीसाठी कौशल्य विकास व उद्योजकता खात्याविरोधात सोमवारपासून राज्यातील ४१७ अशासकीय आयटीआयच्या
मुंबई : अशासकीय आयटीआयला इतर राज्यांच्या धर्तीवर अनुदान मिळावे या मागणीसाठी कौशल्य विकास व उद्योजकता खात्याविरोधात सोमवारपासून राज्यातील ४१७ अशासकीय आयटीआयच्या प्राचार्य व कर्मचारी संघटनेने बेमुदत बंद पुकारलेला आहे. संघटनेचे अध्यक्ष संजय बोरस्ते यांना पितृशोक झाल्याने आंदोलन पुढे ढकलल्याची चर्चा होती. मात्र, अशासकीय आंदोलनाचा प्रश्न अंतिम टप्प्यात आला असल्याने आंदोलन ठरल्या तारखेलाच होणार असल्याचे स्पष्टीकरण बोरस्ते यांनी दिले आहे.
या आंदोलनात राज्यातील ४१७ खासगी आयटीआय सामील होणार असून, राज्य शिक्षण संस्था महामंडळानेही आंदोलनाला पाठिंबा दिल्याचे बोरस्ते यांनी सांगितले. ते म्हणाले की, नागपूर हायकोर्टात याच प्रश्नावर दाखल केलेल्या याचिकेवर नुकतीच सुनावणी झाली. त्यात हायकोर्टाने अशासकीय आयटीआयमधील कर्मचाऱ्यांच्या वेतन अनुदानाच्या प्रश्नावर सरकारला जाब विचारत चार आठवड्यांत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत. अशा परिस्थितीत आंदोलन स्थगित केल्यास किंवा पुढे ढकलल्यास सर्वच आयटीआयच्या कर्मचाऱ्यांच्या वेतन अनुदानाचा प्रश्न रेंगाळण्याची चिन्हे आहेत. परिणामी, आंदोलन नियोजनाप्रमाणेच होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कर्नाटक व गुजरात राज्यांप्रमाणे वेतन अनुदान देण्याची संघटनेची मागणी आहे. मात्र यासंदर्भात कोणतीही सकारात्मक चर्चा शासनाने केली नसल्याने सोमवार, ११ जानेवारी रोजी राज्यातील सर्व खाजगी आयटीआय बेमुदत बंद करून प्राचार्य, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी आझाद मैदानावर धडकण्याचे आवाहन बोरस्ते यांनी केले आहे.
राज्यभर आंदोलन करा!
सर्व आयटीआयचे प्राचार्य, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी आंदोलनात जोमाने उतरण्याचे आवाहन बोरस्ते यांनी केले आहे. प्रत्येक आयटीआयमधील कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना मुंबईतील आझाद मैदानावर धडकणे शक्य नाही.
त्यामुळे कर्मचारी व प्राचार्यांनी त्या-त्या जिल्ह्यातील
जिल्हा व्यवसाय अधिकारी कार्यालयावर प्रशिक्षणार्थींचे मोर्चे काढून शासनाचा निषेध करण्याचे आवाहन बोरस्ते यांनी केले आहे.