सहकारी बँकांचे खासगीकरण अमान्य- प्रभू
By admin | Published: December 13, 2015 01:02 AM2015-12-13T01:02:41+5:302015-12-13T01:02:41+5:30
सहकारी बँकांनी खासगी क्षेत्रातील संस्थांबरोबर जरूर काम करावे, पण या बँकांचे खासगीकरण करणे योग्य नाही. सध्या खासगीकरणाची चर्चा सुरू आहे, पण त्याला विरोध केला पाहिजे.
सोलापूर : सहकारी बँकांनी खासगी क्षेत्रातील संस्थांबरोबर जरूर काम करावे, पण या बँकांचे खासगीकरण करणे योग्य नाही. सध्या खासगीकरणाची चर्चा सुरू आहे, पण त्याला विरोध केला पाहिजे. सरकारनेही सहकार क्षेत्राच्या विकासासाठी धोरण आखले पाहिजे, असे स्पष्ट मत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी शनिवारी व्यक्त केले.
सोलापूर जनता बँकेने सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या सहकार परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यास प्रभू यांनी नवी दिल्लीहून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. जपानचे पंतप्रधान शिंझो अबे यांच्या भारतदौऱ्यामुळे ते या परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहू शकले नाहीत. सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार यांच्या हस्ते सहकार परिषदेचे उद्घाटन झाले. सुरेश प्रभू म्हणाले की, भारताच्या नवनिर्मिती अर्थात भारत निर्माण महायज्ञ सहकार क्षेत्राच्या सहभागाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. सहकार क्षेत्र जगले, वाढले पाहिजे, यासाठी करप्रणाली निश्चित करताना आणि कायदे करताना सरकारने योग्य धोरणे आखावित. याचबरोबर सहकार क्षेत्रानेही आपल्यातील वैगुण्य दूर करून प्रगतीचा मार्ग अवलंबिला पाहिजे.