सैन्य दलासाठी अविरत सेवा
By admin | Published: May 18, 2015 03:49 AM2015-05-18T03:49:09+5:302015-05-18T03:49:09+5:30
माता आणि मातृभूमीची सेवा ही सर्वश्रेष्ठ मानली जाते़ परंतु, आज प्रत्येक जण आपल्या कुटुंबाच्या परिघाबाहेर पडत नसल्याचे वास्तव दिसून येते़
राम तत्तापूरे,अहमदपूर (जि़ लातूर)
माता आणि मातृभूमीची सेवा ही सर्वश्रेष्ठ मानली जाते़ परंतु, आज प्रत्येक जण आपल्या कुटुंबाच्या परिघाबाहेर पडत नसल्याचे वास्तव दिसून येते़ मात्र अहमदपूर तालुक्यातील केंद्रेवाडी येथील सैन्य दलातील तांत्रिक कर्मचारी अशोक केंद्रे यांनी सेवानिवृत्तीनंतर मोफत सैनिक प्रशिक्षण केंद्र सुरू करून मातृभूमीसेवा ही सर्वश्रेष्ठ असल्याचे युवकांच्या मनावर बिंबविले़ त्यांच्या प्रयत्नामुळे १३ हजार युवक आज देशाच्या कानाकोपऱ्यात मातृभूमीची सेवा बजावत आहेत़
अहमदपूर तालुक्यातील केंद्रेवाडी सैनिकांचे गाव म्हणून ओळखले जाते़ गावातील प्रत्येक घरातील किमान एक व्यक्ती सैन्यदलात आहे़ वारकरी कुटुंबातील केंद्रे यांनी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग केल्यानंतर देशसेवेसाठी १९८३ साली तांत्रिक कर्मचारी म्हणून सैन्य दलात रुजू झाले़ त्यांच्यासोबत त्यांचे बंधू अनिरुद्ध केंद्रे हेही सैन्यदलात दाखल झाले़ त्यांनी साडेसतरा वर्षे सेवा केली़ त्याचदरम्यान, भरतीत आपल्या भागातील युवक लेखी अथवा शारीरिक चाचणी परीक्षेत अनुत्तीर्ण होत असल्याचे त्यांनी पाहिले़ त्यामुळे सैन्य दलाचे महत्त्व सांगण्यासाठी आपणच प्रशिक्षण केंद्र सुरु करावे, असा विचार त्यांच्या मनात आला.