नोटाबंदीपूर्वीच ‘सागर’ बुडाली
By Admin | Published: May 14, 2017 03:05 AM2017-05-14T03:05:56+5:302017-05-14T03:05:56+5:30
बदलापूरमधील सागर इन्व्हेस्टमेंट ही कंपनी नोटाबंदीच्या काळात बुडाली
लोकमत न्यूज नेटवर्क
बदलापूर : बदलापूरमधील सागर इन्व्हेस्टमेंट ही कंपनी नोटाबंदीच्या काळात बुडाली, असा दावा गुंतवणूकदार करत आहेत. मात्र, सागर इन्व्हेस्टमेंटची पैसे फिरवण्याची साखळी ही आधीच तुटलेली होती. तीन ते चार वर्षांपूर्वी व्याजदर कमी करून त्यांनी गुंतवणूकदारांना त्याची हलकीशी कल्पनाही दिली होती. मात्र, जास्त व्याजदराच्या लोभात सागर इन्व्हेस्टमेंटमध्ये निर्माण झालेली आर्थिक कोंडी गुंतवणूकदारांच्या लक्षातच आली नाही. केवळ नोटाबंदीचा आधार घेऊन सागर इन्व्हेस्टमेंटने कंपनी बुडाल्याचे जाहीर केले आहे.
२८ वर्षांपासून जास्त व्याजदर देणारी आणि शेकडो गुंतवणूकदारांचे पैसे फिरवणारी सागर इन्व्हेस्टमेंट कंपनी बुडीत निघाली आहे. त्यामुळे शेकडो गुंतवणूकदारांचे पैसे त्यात अडकले. गुंतवणूकदारांचेच पैसे अन्य गुंतवणूकदारांचे व्याज देण्यासाठी वापरण्यात येत होते. व्याजदर जास्त मिळत असल्याने सर्वसामान्यांनीही दोन लाखांपासून २० लाखांपर्यंतची गुंतवणूक केली होती. त्यात शहरातील काही बड्या उद्योजकांनीही जास्त व्याजासाठी २५ लाखांपासून ते १ कोटीपर्यंतची गुंतवणूक केली होती.
२८ वर्षे न चुकता व्याज मिळत असल्याने सागर इन्व्हेस्टमेंटच्या अनेक शाखा पुणे, ठाणे, डोंबिवली येथे सुरू झाल्या. आलेलीच रक्कम व्याजाच्या स्वरूपात फिरवण्याचा हा व्यवसाय कुठेतरी अडचणीत येणार, याची कल्पना सागर इन्व्हेस्टमेंटचे प्रमुख श्रीराम समुद्र, अनघा समुद्र, भक्ती समुद्र, सुहास समुद्र आणि सुनरता समुद्र यांना होती. मात्र, जोपर्यंत सुरू आहे, तोपर्यंत व्यवसाय सुरूच ठेवण्याचा निर्णय समुद्र कुटुंबीयांनी घेतला होता. अखेर, या साखळीचा शेवट नोव्हेंबर २०१६ मध्ये नोटाबंदीच्या काळात झाला.
नोटाबंदीमुळे कोट्यवधी रुपये वाया गेल्यानेच कंपनीला उतरती कळा लागली, अशी अफवा शहरात पसरवण्यात आली. मात्र, ही कंपनी नोटाबंदीनिमित्ताने बुडाली, हे दर्शवण्याचा प्रयत्न समुद्र कुटुंबीयांनी केला. नोटाबंदीच्या काळात सागर इन्व्हेस्टमेंटकडे कोट्यवधी रुपये पडून होते, असा अंदाज जरी काढला तरी त्याचे संचालक ही रक्कम आपल्या गुंतवणूकदारांना व्याजाच्या स्वरूपात वाटून जुन्या नोटा बाहेर काढू शकत होते.
गुंतवणूकदारांना व्याजाच्या स्वरूपात आलेली रक्कम गुंतवणूकदार आपल्या जबाबदारीवर बँकेत भरणेही शक्य होते. मात्र, नोटाबंदीच्या काळातही सागर इन्व्हेस्टमेंटकडे जुन्या नोटा नव्हत्या, हे उघड होते.
व्याजदर हळूहळू कमी करत गेले
मुळात ही व्याज देण्याची साखळी तीन ते चार वर्षांपूर्वीच कमकुवत झाली होती. त्यामुळेच आधी १८ टक्के व्याज देणाऱ्या सागर कंपनीने नंतर हाच व्याजदर १५ आणि शेवटी १२ टक्के केला. यावरून, कंपनी बुडत असल्याचा अंदाज आधीच आला होता. मात्र, जास्त व्याजाच्या मोहात अनेकांचे पैसे या कंपनीत अडकले आहेत.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच गुंतवणूकदारांच्या पायाखालची वाळूच सरकली. आपल्याला न्याय मिळावा यासाठी सुमारे दीड हजार गुंतवणूकदारांनी मध्यंतरी आमदार किसन कथोरे यांची भेट घेऊन आपले गाऱ्हाणे मांडले. त्यांनी या गुंतवणूदारांचे म्हणणे ऐकून घेतले. कंपनीच्या संचालकांची मालमत्ता विकून आम्हाला पैसे मिळावेत अशी मागणी या गुंतवणूकदारांनी यावेळी कथोरे यांच्याकडे केली होती. मात्र तांत्रिकदृष्ट्या शक्य नसल्याचे ते म्हणाले.