अवकाळीमुळे जनजीवन विस्कळीत, रब्बीला फटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2024 06:26 IST2024-12-28T06:26:24+5:302024-12-28T06:26:39+5:30
पावसामुळे हरभरा, तूर, भाजीपाल्याला फटका

अवकाळीमुळे जनजीवन विस्कळीत, रब्बीला फटका
अकोला/जळगाव : यवतमाळ, अकोला, जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात शुक्रवारी अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळित झाले. या पावसाचा रब्बी पिकांना मोठा फटका बसला आहे. तसेच तापमानात घट झाली आहे.
अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने वातावरणात बदल होऊन पावसाळी वातावरण तयार झाले आहे. २७ डिसेंबर रोजी सकाळी अकोला शहरासह जिल्ह्यात बराचवेळ रिमझिम पाऊस बरसला. या पावसामुळे हरभरा, तूर, भाजीपाल्याला फटका बसला.
केगाव येथे वीज पडून महिलेचा मृत्यू : यवतमाळच्या मारेगाव तालुक्यातील केगाव येथे मेघा गणपत पानघाटे (४५) या महिलेच्या अंगावर वीज पडून जागीच मृत्यू झाला. लक्ष्मी तोडासे (५०) ही महिला जखमी झाली.
रावेर (जि. जळगाव) : रावेर व यावल तालुक्यातील काही भागांत शुक्रवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास गारपिटीसह अवकाळी पाऊस झाला. न्हावी आणि पाडळसा (ता. यावल) येथे सुपारीएवढ्या गारा पडल्या. जळगाव शहरात दुपारी १५ मिनिटे जोरदार पाऊस झाला.