डॉक्टरांच्या संपामुळे सर्वसामान्य रुग्णांचे हाल
By Admin | Published: March 23, 2017 02:02 AM2017-03-23T02:02:19+5:302017-03-23T02:02:19+5:30
महापालिका आणि सरकारी रुग्णालयांत दररोज हजारो रुग्ण राज्याच्या कानाकोपऱ्यातून उपचारासाठी येत असतात. त्यामुळे
मुंबई : महापालिका आणि सरकारी रुग्णालयांत दररोज हजारो रुग्ण राज्याच्या कानाकोपऱ्यातून उपचारासाठी येत असतात. त्यामुळे सकाळपासून सायंकाळपर्यंत रुग्णालयांत गजबज असते. मात्र, सोमवारपासून मुंबईतील रुग्णालयांमध्ये चित्र वेगळे दिसत आहे. धुळ्यापाठोपाठ निवासी डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्यामुळे निवासी डॉक्टरांच्या मनात असुरक्षतेतची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे सोमवारपासून निवासी डॉक्टर सामूहिक रजेवर असून, मुंबईतील आरोग्य व्यवस्था ढासळली आहे. रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग बंद ठेवण्यात आले आहेत. पण, काही रुग्णालयांमध्ये वरिष्ठ डॉक्टरांनी बाह्यरुग्ण विभागात रुग्ण तपासले. तर, नियमित शस्त्रक्रिया पुढे ढकलून फक्त आपत्कालीन शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
निवासी डॉक्टर संपावर गेले असले तरीही रुग्ण सेवेवर परिणाम झालेला नाही. जे.जे. रुग्णालयात नेहमीपेक्षा अधिक रुग्णांची तपासणी करण्यात आली. अन्य दिवशी ३ हजार १०० रुग्णांची बाह्यरुग्ण विभागात तपासणी केली जाते. बुधवारी बाह्यरुग्ण विभागात ३ हजार ४०० रुग्ण तपासण्यात आले. तर नेहमी १५५ शस्त्रक्रिया होतात. पण, आज १६८ शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांनी दिली. केईएमच्या बाह्यरुग्ण विभागात ५६२ रुग्ण तपासण्यात आले. ३८ मोठ्या आणि ३६ लहान शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
बाळाचा जीव वाचला-
माझा मुलगा नऊ महिन्यांचा आहे. गेल्या दोन दिवसांपासून तो तापाने फणफणत होता. त्यामुळे त्याला घेऊन आम्ही कूपरला आलोय. माझे पती कामावर गेल्याने एकटीला धावपळ करावी लागत आहे. मात्र सगळीकडे संप असूनही या रुग्णालयात मात्र माझ्या बाळावर डॉक्टरांनी उपचार सुरू केले. वेळीच उपचार मिळाल्याने माझ्या बाळाचा जीव वाचला.
- नसीमा खान, अंधेरी
बाळावर त्वरित उपचार!-
आम्ही गोरेगावला राहतो. माझ्या दोन वर्षांच्या बाळाच्या त्वचेवर अचानक काही रॅश आली. ज्यामुळे त्याला आम्ही तातडीने सकाळी कूपर रुग्णालयात आणले. डॉक्टरचा संप सुरू असल्याने मनात भीती होती. मात्र इथे आल्यावर डॉक्टरांनी तपासून त्याच्यावर उपचार सुरू केले.
- मोजम्मा वर्गीस, गोरेगाव
रातोरात उपचार-
माझ्या पायाला अचानक सूज आल्याने मला चालणे अशक्य झाले. ज्यामुळे मंगळवारी उशिरा रात्रीच आम्ही कूपरला आलो. तेव्हा त्या ठिकाणी असलेल्या डॉक्टरांनी माझ्यावर उपचार केले. पायाच्या दुखण्यामुळे मला असह्य वेदना होत होत्या.
- किमया चव्हाण, जोगेश्वरी
नायर रुग्णालयात वरिष्ठ डॉक्टर सेवेत -
गेल्या तीन दिवसांपासून निवासी डॉक्टर कामावर न आल्याने काही प्रमाणात रुग्णसेवेला धक्का बसला. पण, रुग्णांचे हाल होऊ नयेत म्हणून नायर रुग्णालयातील सर्व वरिष्ठ डॉक्टर, प्राध्यापक रुग्ण सेवा देत होते. निवासी डॉक्टर नसल्यामुळे तपासणीसाठी वेळ लागत होता. आपत्कालीन परिस्थिती असेल तरच उपचार केले जात होते. एक्सरे काढण्यासाठीही रांगा लागल्या होत्या. शस्त्रक्रिया पुढे ढकल्याने रुग्ण नाराज होते.
कूपर रुग्णालयात निवासी डॉक्टरांनी केली मदत -
निवासी डॉक्टरांनी कामाला सुरुवात केल्यामुळे कूपर रुग्णालयात दोन दिवसांत ३० शस्त्रक्रिया पार पाडल्या़ रुग्णालयात सुरक्षेच्या उपाययोजना आखल्याने निवासी डॉक्टर कामावर रुजू झाल्याचे सांगण्यात आले. संपामुळे घरी परत जावे लागेल किंवा आपल्याला उपचार मिळणार नाहीत अशी भीती असूनही अनेक रुग्णांनी कूपर रुग्णालयात धाव घेतली. मात्र त्यांची निराशा न होता त्यांच्यावर योग्य उपचार डॉक्टरांनी केल्याने त्यांनाही हायसे वाटले.
सायन रुग्णालयाला छावणीचे स्वरूप -
च्सायन रुग्णालयात निवासी डॉक्टरला झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर निवासी डॉक्टरांच्या मनात असुरक्षिततेची भावना अधिक प्रबळ झाली. महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयातही अशा घटना घडत असल्यामुळे निवासी डॉक्टरांनी रजा टाकली.
च्या प्रकरणानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून येथे पोलीस तैनात करण्यात आले. रुग्णालयाच्या बाहेर पोलीस असल्यामुळे रुग्णालयात तणावपूर्ण वातावरण होते. बाह्यरुग्ण विभागात वरिष्ठ डॉक्टरांनी काम केले. आपत्कालीन व्यवस्था सुरू होती.
केईएममध्ये रुग्णाबरोबर एकच नातेवाईक -
केईएम रुग्णालयात नेहमी एका रुग्णाबरोबर अनेक नातेवाइकांना सहज जाता येते. पण, निवासी डॉक्टर कामावर नसल्यामुळे गेटवर अधिक सुरक्षा तैनात करण्यात आली होती. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून एका रुग्णाबरोबर एकाच नातेवाइकाला आत जाऊ दिले जाते. रुग्णाची प्रकृती अत्यवस्थ असल्याने आपत्कालीन विभागात उपचार दिले जात आहेत़